घरCORONA UPDATEकोरोनाग्रस्तांच्या मृत्यूत मुंबईची महाराष्ट्राबरोबर तुलना

कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूत मुंबईची महाराष्ट्राबरोबर तुलना

Subscribe

कोरोना ‘कोविड १९’ च्या संसर्गजन्य आजारामुळे रुग्णांबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. मंगळवारी मुंबईत एकाच दिवशी २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मुंबईतील रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही २४४ वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातील मृत्यूचा आकडा मंगळवारपर्यंत ४०० होता. मात्र, मागील दहा दिवसांपासून रुग्ण संख्या आणि मृत्यूचा आकडा कमी दर्शवण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून होत असतानाच आता मागील दहा दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करत महापालिका प्रशासनाने मुंबईची तुलना राज्याशी केली आहे. राज्यापेक्षा मुंबईतील रुग्ण संख्या आणि मृत्यूचा दर कमी झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केंद्रीय समितीच्या हवाला देत केला आहे.

मुंबईत ११ मार्च २०२० रोजी पहिला कोरोना रुग्ण सापडला. या संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर महापालिकेने रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा कसून शोध घ्यायला सुरुवात केली. परिणामी २६ एप्रिल पर्यंत तब्बल १ लाख २९ हजार ४७७ रूग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधण्यात आले. यातील २१ हजार ५३ हे हाय रिस्क गटातील संपर्क होते. यातून १ हजार ६४७ रूग्ण शोधता आले. ‘कोरोना कोविड १९’ चा प्रसार होऊ नये, म्हणून या रुग्णांच्या संपर्कातील लोकांपैकी ज्यांच्या घरी व्यवस्था होऊ शकते, अशा रुग्णांच्या बाबत घरच्याघरी विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिवाय रूग्ण एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ नये, यासाठी ‘कंटेनमेंट झोन’ तयार केले.

- Advertisement -

‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराने बाधित झालेल्या रुग्णांच्या वाढीचा वेग मुंबई मंदावत असल्याचा निष्कर्ष केंद्र शासनाद्वारे नियुक्त समितीने काढला आहे. या निष्कर्षांनुसार १७ ते २७ एप्रिल दरम्यान रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांवर गेला आहे. जो यापूर्वी ८.३ दिवस असा होता. देशाच्या पातळीवर रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी हा ९.५ दिवस एवढा आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर हा कालावधी ८.९ दिवस इतका आहे. ही बाब नोंदवत केंद्रीय समितीने मुंबई महानगरपालिकेच्या सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक प्रयत्नांचे कौतुक केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

केंद्रीय समितीने आपल्या निष्कर्षांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येचे विश्लेषण करून त्याआधारे मुंबईतील बाधित रुग्णांचा मृत्यू दर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा कमी असल्याचे निरीक्षणही नोंदविले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्तरावर दर शंभर बाधित रुग्णांना मागे सरासरी ४.३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे. तर मुंबईत दर शंभर बाधित रुग्णांना मागे सरासरी ३.९ रुग्णांचे दुर्दैवी मृत्यू होत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील बाधित रुग्णांचा मृत्युदर सरासरी ६.३ टक्के एवढा होता.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी संशयित कोरोना रुग्णांचे मृतदेह विल्हेवाटीच्या प्रतीक्षेत ‘केईएम’ रुग्णालयात पडून असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत विल्हेवाटीसंदर्भात एक धोरण बनवण्याची मागणी केली. मात्र, मागील दहा दिवसांमध्ये कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांची नोंद कोरोनाच्या मृतांमध्ये नोंदवली गेलेली नाही. मात्र, या चाचणी अहवालाबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या पत्रकारांचे अहवाल आठ दिवसांमध्ये निगेटिव्ह आल्याने शंका उपस्थित केली होती. त्यामुळे मृत व्यक्तींच्या चाचणी अहवालामध्येही बदल केला जावू शकतो,अशी शंकाही उपस्थित होत आहे. जेणेकरून करोनाच्या मृतांचा आकडा कमी करण्यात प्रशासनाला यश येवू शकते,असे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -