घरCORONA UPDATEअधिकची बिल वसूली; फोर्टीज आणि न्युरोजन हॉस्पिटल विरोधात तक्रार

अधिकची बिल वसूली; फोर्टीज आणि न्युरोजन हॉस्पिटल विरोधात तक्रार

Subscribe

कोविड रुग्णालयाकडून अतिरिक्त बिल वसूल केल्याचा ठपका ठेवत रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, पालिका आयुक्त अन्नासाहेब मिसाळ यांनी सदर तक्रारीची गंभीरपणे दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. नागरिकांकडून वैद्यकिय सुविधांकरीता रुग्णालयांमार्फत आकारण्यात येणाऱ्या दरांबाबत तक्रारी असल्यास त्याचे त्वरीत निराकरण करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी महापालिका स्तरावर विशेष लेखा परिक्षण समिती गठीत केली आहे.

दरम्यान, समितीकडे प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने समिती अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी वाशी येथील फोर्टीज हॉस्पिटल आणि सीवूड नेरुळ येथील न्युरोजन हॉस्पिटल याठिकाणी उप आयुक्त मनोज महाले, लेखा अधिकारी शाम पाटील आणि मारुती राठोड या समिती सदस्यांसह भेटी देऊन तक्रारीच्या अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी केली.

- Advertisement -

यामध्ये फोर्टीज हॉस्पिटलशी संबंधीत तक्रारदार रुग्णाच्या देयकातील अनामत रक्कम परतावा न झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार विशेष लेखा परिक्षण समितीने रुग्णालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी केली असता रुग्णालयामार्फत २५ हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. तक्रारदार रुग्णाचा रुग्णालयीन खर्च मेडिक्लेम पॉलीसी मधून करण्यात आलेला असल्याने संबंधित विमा कंपनीकडून रुग्णालयाला परतावा आल्यानंतर अनामत रक्कम तक्रारदाराच्या बँक खात्यात आर.टी.जी.एस. मार्फत जमा केली जाणार आहे, असे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

याबाबतची कागदपत्रे तपासणीअंती मेडिक्लेम पॉलीसीच्या आधारे उपचार झालेल्या रुग्णांच्या देयकातील सुरक्षा अनामत परताव्याची पध्दती सर्वसाधारणपणे अशीच असल्याचे निदर्शनास आले. तथापि समिती अध्यक्षांनी यापुढील काळात रुग्णालयाने रुग्णास डिस्चार्ज कार्डसोबत अनामत रक्कमेच्या परताव्याच्या कालावधीबाबत अंडरटेकींग लिहून द्यावे, असे सूचित केले. ते रुग्णालय व्यवस्थापनाने मान्य केले.

- Advertisement -

अशाचप्रकारे सीवूड नेरुळ येथे न्युरोजन हॉस्पिटलशी संबंधीत तक्रारदार रुग्णाच्या देयकाच्या अनुषंगाने कागदपत्रांची तपासणी केली असता या रुग्णास कोव्हीड व्यतिरिक्त किडनीचाही विकार होता. त्यामुळे त्या रुग्णाला दोन्ही प्रकारचे उपचार करण्यात आले. त्यानुसार त्याची देयक रक्कम तपासली असता ती  २१  मे २०२० रोजीच्या शासन परिपत्रकानुसार असल्याचे समितीच्या निदर्शनास आले.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर ७२ तासांच्या आत त्याचे निराकरण करण्याच्या दृष्टीने विशेष लेखा परिक्षण समिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गतीमानतेने काम करत असून सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याबाबत काळजी घेण्यात येत आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २१ मे २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार जाहीर केलेले रुग्णालय सेवांचे दर दर्शनी भागात नागरिकांना सहजपणे दिसतील अशाप्रकारे फलकावर प्रदर्शित केले आहेत. त्याचप्रमाणे रूग्णालयात उपलब्ध बेड्स संख्येचा फलकही तेथे लावण्यात आलेला असून तो अद्ययावत ठेवण्यात येतो आणि महानगरपालिकेस त्याची माहिती पाठविण्यात येते. त्याचीही विशेष पाहणी समिती अध्यक्ष तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -