Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई लॉकडाऊनबाबत संभ्रम, जमावबंदी की लॉकडाऊन सरकारने स्पष्ट करावे

लॉकडाऊनबाबत संभ्रम, जमावबंदी की लॉकडाऊन सरकारने स्पष्ट करावे

Related Story

- Advertisement -

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदी तर रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. मात्र, प्रत्यक्षात राज्यात मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर नाशिक अशा अनेक ठिकाणी पालिका व पोलिसांकडून दुपारी 2 नंतर दुकाने बंद केली गेली.त्यामुळे राज्यभर सकाळी जमावबंदी आहे की संपूर्ण लॉकडाऊन आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी आणि सर्वसामान्यांमध्ये लॉकडाऊनची भीती पसरल्याचे चित्र मंगळवारी दिसून येत होते.

दिवसा जमावबंदी असताना राज्यात सर्वत्र ठिकठिकाणच्या प्रशासन तसेच पोलिसांनी गर्दी होऊ नये म्हणून बाजार तसेच दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे दुकानदार संभ्रमीत झाले होते, तर नागरिकांची गैरसोय झाल्यामुळे सर्वभ नाराजीचे वातारवण होते. शनिवार-रविवारप्रमाणे इतर दिवशीसुद्धा लॉकडाऊन झाला का, अशी विचारणा होत होती. काही ठिकाणी व्यापारी तसेच नागरिकांनी या बंदीविरोधात घोषणाही दिल्या. तर काही जागी व्यापारी तसेच नागरिक पोलिसांबरोबर हुज्जत घालत होते.

- Advertisement -

मुंबईत दादर, घाटकोपर, कुर्ला, वांद्रे, बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी यासारखी अनेक महत्वाच्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या कोेरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पाच दिवस जमावबंदी व संचारबंदी आणि शनिवार-रविवारी मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी रस्त्यांवर तुरळक गर्दी तर रात्री सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता.

मात्र, मंगळवारी दुपारपासून मुंबईतील अनेक ठिकाणी संपूर्ण लॉकडाऊन असल्याप्रमाणे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. मुंबई महापालिकेने मंगळवारी दुपारी 2 वाजल्यानंतर शहरातील सर्वच दुकाने बंद करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार पोलिसांनी शहरातील ठिकठिकाणी घोषणा करत दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडले आहे. जमावबंदीमध्ये दुकाने सुरू ठेवली जाणार असल्याने व्यापार्‍यांकडून जमावबंदीला फारसा विरोध नव्हता.

- Advertisement -

मात्र, प्रत्यक्षात मंगळवारी कसलीच सूचना न देता व्यापार्‍यांना अचानक दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले. दुकाने अचानक का बंद केली जात आहेत, दुकाने पुन्हा कधी सुरू करायची, दुसर्‍या दिवशी सकाळी दुकाने सुरू करायची का असे अनेक प्रश्न व्यापार्‍यांकडून उपस्थित करण्यात येत होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत त्यांना काहीही उत्तर न देता पालिका व पोलिसांकडून शहरातील सर्व दुकाने धडाधड बंद करण्यात आली. दुकाने पुन्हा कधी सुरू करायची याबाबतही कोणतीही कल्पना पोलिसांकडून दिली जात नसल्याने व्यापार्‍यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.

एकीकडे दुकाने अचानक बंद केली जात असताना खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना दुकाने बंद असल्यामुळे पिशवी हलवतच घरी जावे लागले. दादर, कुर्ला, घाटकोपर, वांद्रे, बोरिवली, अंधेरी यासारख्या बाजारांमध्ये दुकाने बंद ठेवल्याने झालेल्या शुकशुकाटामुळे जमावबंदी आहे की लॉकडाऊन असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत होता. अचानक दुकाने बंद केल्यामुळे लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले पाहायला मिळत होते. दुकाने बंद ठेवण्याबाबत व्यापार्‍यांना कोणत्याही स्पष्ट सूचना न दिल्याने त्यांनाही ग्राहकांना काहीही सांगता येत नव्हते. त्यामुळे मंगळवारी दुपारनंतर मुंबईमध्ये एकप्रकारे लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते.

कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत मी मंगळवारी सकाळी दुकान सुरू केले. दुपारपर्यंत दुकान व्यवस्थित सुरू होते. दुपारी 2 नंतर पोलिसांनी येऊन अचानक दुकान बंद करण्यास सांगितले. दुकान कधीपर्यंत बंद ठेवायचे, कधी सुरू करायचे याबाबत मात्र पोलिसांकडून काहीच सांगण्यात आले नाही. त्यामुळे नेमकी जमावबंदी आहे की लॉकडाऊन हे कळत नाही.
– गणेश रामगुडे, विक्रेता, विक्रोळी

बाजारामध्ये मंगळवारी दुपारी सामान खरेदीसाठी गेलो असता सर्वच दुकाने बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे लॉकडाऊन असल्याचे जाणवले. जमावबंदी, संचारबंदीसंदर्भात सरकारने स्पष्टता आणावी. जेणेकरून नागरिकांमधील संभ्रम दूर होण्यास मदत होईल.
– प्रदीप वेंगुर्लेकर, नागरिक, बोरिवली

नव्याने अधिसूचना जारी करा देवेंद्र फडणवीस 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या शहरातील रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे. अशावेळी राज्य मंत्रिमंडळाने राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांबाबत छोटे व्यावसायिक आणि अन्य क्षेत्रातून विरोध होताना दिसतोय. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, असे ट्वीट फडणवीसांनी केले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावाले लागतील, असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊनसदृश्य निर्बंध घालण्यात आलेत. त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन त्याचा विरोध करत आहेत. हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून, अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे मोठा फटका बसतो आहे. ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे, असे फडणवीस पत्रात म्हणतात. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे.

अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर वाहतूक खुली ठेवण्यात गॅरेज आणि स्पेअर पार्ट्स दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहे. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत. यामुळे माझी विनंती आहे की, पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करुन त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरीबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनाला रोखणे महत्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. आपण तत्काळ या संदर्भात पाऊले उचलाल, असा विश्वास वाटतो, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -