…तर तुमच्यावर गुन्हा दाखल करू, काँग्रेस नेत्यांना पोलिसांची नोटीस

साकीनाका परिसरात जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्याला सर्वस्वी तुम्हाला जबाबदार धरले जाईल, असं नोटीसीत म्हटले आहे.

लष्कराची अग्निपथ योजना (Agneepath Scheme), वाढती महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment), वाढती जीएसटी (GST) आणि कंत्राटी पद्धतीच्या विरोधात काँग्रेसने आज देशभर आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच काँग्रेसच्या विविध नेत्यांना पोलिसांनी नोटीब बजावले आहे. आरिष खान, समीर नाईक, विदेश सिद्धू, या नेत्यांना त्यांच्या स्थानिक पोलीस ठाण्यातून नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्याला सर्वस्वी तुम्हाला जबाबदार धरले जाईल, असं नोटीसीत म्हटले आहे. (Congress leader received notice from Mumbai police)

या नोटीसीत पोलिसांनी म्हटले आहे की, तुम्ही पोलीस ठाण्याच्या परिसरातील रहिवासी असून काँग्रेसचे पदाधिकारी आहात. कमला नेहरू पार्क, मलबार हिल येथे उपस्थित राहून तुम्ही राजभवनाला घेराव घालण्याकरता जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी असून राज्यातील राजकीय घडामोडी पाहता सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन आपल्याकडून राजभवन या ठिकाणी आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यास व त्यामुळे साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तुम्हाला सर्वस्वी जबाबदार धरले जाईल. त्याबाबत दखलपात्र/अदलखपात्र गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो, असा इशारा या नोटीसीतून देण्यात आले आहे.


पोलिसांच्या या नोटीसीला आव्हान देण्यात येतंय की नोटीस प्राप्त झाल्याने शांततेत मोर्चा काढण्यात येईल का हे पाहावं लागणार आहे. तर, जबजब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है, असं ट्विट काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांनी केलं आहे.