कथित अदानी घोटाळ्याविरोधात काँग्रेस सोमवारी राजभवनला घेराव घालणार

Nana Patole clarified the role of Congress to fight against BJP

मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहाच्या कथित घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस पक्ष पुन्हा आक्रमक झाला आहे. अदानी समूहाच्या महाघोटाळ्याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार मौन पाळून असल्याच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसच्या सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबईत धडक मोर्चा काढून राजभवनला घेराव घालण्यात येणार आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची उद्योगपती अदानींवर विशेष मेहरबानी असून या विशेष मेहरबानीतूनच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसीमधील कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला. आता अदानी समूहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याने जनतेचा कष्टाचा पैसा सुरक्षित राहिला नाही. अदानी महाघोटाळ्याप्रश्नी मोदी सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. परंतु काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी जाब विचारत असून सोमवारी १३ मार्चला मुंबईत धडक मोर्चा काढून राजभवनला घेराव घातला जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी दिली.

मोदींच्या हुकूमशाही कारभामुळे देश आर्थिक संकटातून जात आहे. त्यातच जनतेचा पैसा अदानीच्या घशात घालून त्यांनाही आर्थिक संकटाच्या खाईत लोटण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानीचा फुगा लवकर फुटेल अशी भिती व्यक्त केली होती. पण मोदी सरकार वेळीच सावध झाले नाही. विरोधी पक्षांचे मोदी ऐकतच नाहीत. अदानीचा फुगा फुटला आणि जनतेचा पैसा धोक्यात आला आहे. हा पैसा बुडेल अशी भिती वाटते, असे पटोले म्हणाले.

काँग्रेस पक्षाने संसदेत अदानी महाघोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. पण मोदी सरकारने या घोटाळ्यावर एक शब्दही काढला नाही. मोदी सरकार भ्रष्ट अदानीला पाठीशी घालत आहे. राज्यात दोन दिवसात माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाईने केली. मुश्रीफ यांच्यावर तर ईडी तिसऱ्यांदा कारवाई करत आहे. परंतु याच ईडीला भाजपचे भ्रष्ट नेते दिसत नाहीत, अशी टीका करत विरोधी पक्षांच्या मागे ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचा चौकशीचा ससेमीरा लावणारे मोदी सरकार अदानी घोटाळ्याची चौकशी का करत नाही? असा सवाल पटोले यांनी केला.

दरम्यान, सोमवारी १३ मार्चला दुपारी ३ वाजता गिरगाव चौपाटी ते राजभवन असा मोर्चा काढला जाणार असून राजभवनला घेराव घालण्यात येणार आहे. या मोर्चात पटोले यांच्यासह काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे आदी सहभागी होणार आहेत.