घरमुंबईशीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या कामाचे कंत्राट अखेर रद्द

शीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीच्या कामाचे कंत्राट अखेर रद्द

Subscribe

 स्थायीचे प्रस्ताव रद्द न करता नव्याने मागवली निविदा

कंत्राटदाराशी वाटाघाटी न करता स्थायी समितीच्या मान्यतेनंतर वाटाघाटी करून दर कमी करण्यास मान्यता देवून मंजूर केलेले शीव रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतींच्या पुनर्विकासाच्या कंत्राट काम अखेर रद्द करण्यात आले. कंत्राटदाराने वाटाघाटीमध्ये महापालिकेच्या अंदाजित रकमेपेक्षा १४ टक्क्यांनी लावलेली बोली ८.९९ टक्क्यांच्या खाली आणण्यास तयार नाही,असे निवेदन महापालिका प्रशासनाने मागील स्थायी समितीत सादर केले. परंतु, या निविदेनाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही तसेच महापालिकेने मंजूर केलेला प्रस्ताव समितीपुढे आणून रद्द केलेला नसताना प्रशासनाने परस्पर निर्णय घेत नव्याने लघु निविदा मागवली आहे. त्यामुळे ही निविदा तांत्रिक वादात अडकण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासात तीन इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्या मागील बाजूस तळ अधिक २० मजल्याची परिचारिका महाविद्यालय व निवासी अधिकार्‍यांसाठी निवासस्थान इमारत बांधणे, रुग्णालयाच्या अखत्यारित बराक प्लॉटवर तळ अधिक १९ मजल्याची महापालिकेच्या उपयोगाकरता व कर्मचारी निवास्थानाची इमारत बांधणे तसेच याच ठिकाणी तळ अधिक २५ मजल्यांची पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत, याशिवाय तळ अधिक ३ मजल्याची तात्पुरता निवारा इमारत आदींच्या बांधकामांसाठी नवी दिल्लीतील अर्कोप व शशांक मेहेंदळे अ‍ॅण्ड असोशिएटस आदींनी बनवलेल्या आराखड्यानुसार निविदा मागवल्या.यामध्ये अंदाजित खर्चापेक्षा १४ टक्के अधिक बोली लावणार्‍या अहलुवालिया कॉन्टॅक्ट इंडिया लिमिटेड ही कंपनीला इमारत बांधकाम व पुढील देखभाल यासाठी ६७२.५५ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते.

- Advertisement -

यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. परंतु वाटाघाटी कमी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या त्रिसदस्यीस समिती गठीत करून वाटाघाटी न करताच प्रशासनाने हा प्रस्ताव घाईघाईत स्थायी समितीपुढे आणून त्याला मंजुरी मिळवून घेतली होती. परंतु मागील तीन महिन्यांपूर्वी ही मंजुरी मिळाल्यानंतर वाटाघाटीत कंत्राटदाराने लावलेली कंत्राटाची बोली ८.९९ टक्क्यांपेक्षा कमी दरात करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे मंजूर केलल्या कंत्राट कामांच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करता येत नसल्याचे प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत निवेदनाद्वारे निदर्शनास आणले. परंतु या बैठकी विरोधी पक्षांनी सभात्याग केल्याने या प्रशासनाने सादर केलेल्या निवेदनावर पुढील सभेत निर्णय घेतला जाईल,असे समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सूचना केली. पण पुढील बैठकीत या निवेदनावर कोणताही निर्णय समितीने घेतलेला नाही. तसेच समितीने हा मंजूर केलेला प्रस्ताव रद्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे तांत्रिक दृष्टया कंत्राटाची मान्यता रद्द झालेली नाही. प्रस्तावाची मान्यता रद्द न करताच महापालिका प्रशासनाने या रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतींच्या पुनर्विकासाठी शुक्रवारी निविदा मागवण्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली. शॉर्ट नोटीसद्वारे ही निविदा मागवण्यात आलेली आहे. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी रुग्णालयाचे कंत्राट रद्द करून नव्याने निविदा मागवण्यात आल्याचे स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -