सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कामगारांचा मुंबई महापालिकेवर मोर्चा

Contractual workers protest against Mumbai Municipal Corporation to demand their retention in service

मुंबई, दि.२३ जानेवारी ( प्रतिनिधी.) -: मुंबई महापालिकेत विविध खात्यात सध्या ५१ हजार पदे रिक्त आहेत. विविध खात्यांत कमी वेतनात काम करणाऱ्या हजारो कंत्राटी कामगारांना त्या रिक्त जागांवर पालिका सेवेत घेऊन कायम करावे, या मागणीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियनतर्फ़े २४ जानेवारी रोजी मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढून आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव व सरचिटणीस वामन कविस्कर यांनी दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा, रूग्णालय, किटकनाशक नियंत्रण खाते व इतर खात्यात २००५ पासून १५ – २० हजार कंत्राटी कामगार कमी वेतनात काम करीत आहेत. मात्र त्यांना अपेक्षित सेवासुविधा मिळत नाहीत. ते सर्व कामगार हे पालिका सेवेत कायम होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना पालिका सेवेत कायम करण्याबाबत अनेकदा केवळ आश्वासने देण्यात आली. मात्र त्यांना अद्यापही पालिका सेवेत कायम करण्यात आलेले नाही. पालिकेचे काही अधिकारी व ठेकेदार कंत्राटी कामगारांची संख्या जास्त दाखवून त्यांच्या नावाखाली पालिकेची आर्थिक फसवणूक करीत असल्याचा आरोप यावेळी कामगार नेत्यांनी केला.

वास्तविक, १९९५ साली तत्कालीन महापालिका आयुक्त जनार्दन जाधव यांनी १० हजार कंत्राटी सफाई कामगारांना पालिका सेवेत कायम केले होते. त्याच धर्तीवर पालिकेतील ५१ हजार रिक्त पदांवर हजारो कंत्राटी कामगारांना सामावून घ्यावे, अशी मागणी म्युनिसिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर यांनी केली आहे.
त्यासाठी २४ जानेवारी रोजी दुपारी पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतर युनियनतर्फ़े, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालिका आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मात्र या मोर्चानंतरही कंत्राटी कामगारांच्या मागणीला दाद न दिल्यास युनियनमार्फत आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अशोक जाधव व वामन बाविस्कर यांनी दिला आहे.


उद्धव ठाकरेंचं भाजपला थेट आव्हान, म्हणाले ‘तुम्ही मोदींचा फोटो लावून या, आम्ही….’