घरमुंबईलतादीदींच्या स्मारकावरून राजकारण? शिवाजी पार्कातच व्हावे स्मारक

लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण? शिवाजी पार्कातच व्हावे स्मारक

Subscribe

भाजप आमदार राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, काँग्रेसचीही भूमिका

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकावरून राजकारण सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. लता मंगेशकर यांचे रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अर्थात शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी भाजप आमदार राम कदम यांनी त्यांचे स्मारक बांधण्याची मागणी केली आहे. अशीच मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील केली आहे. या मागणीनंतर लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण करण्यात येऊ नये, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे सुनावले आहे. तर शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावे, त्याची स्मशानभूमी करु नये, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाकुयद्ध रंगण्याची शक्यता आहे.

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर अशा दोघांवर शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणापासून काही अंतरावर त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. शिवसैनिकांच्या दृष्टीने हे स्मृतीस्थळ अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे लतादीदींच्या स्मारकाचा प्रश्न उपस्थित करून येत्या काळात एकप्रकारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रकार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लतादीदींचे स्मारक बांधण्याची मागणी केली आहे. भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क दादर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे त्याच जागेवर गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादीदी यांचे स्मृतीस्थळ उभारावे आणि त्यांच्या स्मृती कायमस्वरुपात जतन कराव्यात, असे जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमी आणि लतादीदींच्या चाहत्यांच्या वतीने मी ही विनंती करत असल्याचे राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. हीच भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील घेतली आहे.

याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, काही लोकांनी ही मागणी केली आहे. परंतु अशी मागणी करण्याची गरज नाही. लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण करू नका. लतादीदी आजही आपल्यात आहेत. लतादीदी या देशाच्या नव्हे, तर जगाच्या आहेत. जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल अशाप्रकारचे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक नक्कीच महाराष्ट्राचे आणि देशाचे सरकार करेल. त्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढारी नव्हत्या. तो आपला अनमोल ठेवा होता. लतादीदींचे स्मारक बनवणे इतके सोपे नाही. त्यांच्या स्मारकाचा विचार देशाने करावा, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क येथेच व्हावे, जेणेकरून कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीच्या स्मरणात लतादीदींचा आवाज कायमस्वरूपी जपला जाईल. अशी काँग्रेसचीही भूमिका आहे.
-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण करू नका. त्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढारी नव्हत्या. तो आपला देशाचा अनमोल ठेवा होता. लतादीदींचे स्मारक बनवणे इतके सोपे नाही. त्यांच्या स्मारकाचा विचार देशाने करावा.
– संजय राऊत, खासदार, शिवसेना

शिवाजी पार्क हे एकमेव खेळाचे मैदान आहे. येथे विद्यार्थ्यांचे सामने होतात. त्यामुळे शिवाजी पार्कवर सामने खेळले जावेत. स्मारक करायचे असेल तर त्यासाठी वेगळ्या जागा आहेत.
-प्रकाश आंबेडकर, प्रमुख, वंबआ

प्रियंका चतुर्वेदींचा राम कदमांवर निशाणा
शिवसेना आणि लता मंगेशकर यांचे घरगुती आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देश शोकाकुल आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप आमदार राम कदम राजकारण करत आहेत. देश लतादीदींच्या आठवणीत असताना राजकारण करण्यात येत आहे. शिवसेनेकडून जेवढे प्रयत्न करता येतील, तेवढे नक्कीच करण्यात येतील, असे शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -