जामीन मिळाला पण रवी राणा आजची रात्र जेलमध्येच, ‘हे’ आहे कारण

राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. कलम १२४ अंतर्गत त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला आहे. मात्र, रवी राणा यांना आजची रात्र कोठडीतच काढावी लागणार आहे. त्यांच्या जामिनाच्या ऑर्डरची कॉपी तळोजा कारागृहात पोचलीच नाही. त्यामुळे त्यांचा रात्रीचा मुक्काम तळोजा कारागृहात असणार आहे.

राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. कलम १२४ अंतर्गत त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रवी राणा नवी मुंबईतील तळोजा कारागृहात तर नवनीत राणा यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते. आता ११ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जामीन मंजूर झाला असला तरी नवनीत राणा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तळोजा कारागृहात जामिनाची आॅर्डर न पोचल्यामुळे रवी राणा यांना एक रात्र तुरूंगात काढावी लागणार आहे.  तळोजा कारागृहात जामीनाची पत्र पेटी उघडण्याची शेवटची वेळ 5.30 मिनिटांची असते. मात्र या वेळेपर्यंत कोर्टातून मिळालेली ऑर्डर कॉपी तिथे पोहोचू शकली नाही.

मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला  50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र राणा दाम्पत्याने जामीनावर असताना माध्यमांशी बोलू नये, अशी अट घालण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था वेठीस धरू नये, पोलीस तपासातील पुराव्यांशी छेडछाड करू नये आदी अटीही घालण्यात आल्या आहेत.  अटींचे पालन न केल्यास जामीन रद्द होऊ शकतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे.