घरCORONA UPDATEकोरोना योद्धा डॉक्टरला बेडसाठी १० तासांची प्रतिक्षा; डॉक्टर भावे यांचा मृत्यू!

कोरोना योद्धा डॉक्टरला बेडसाठी १० तासांची प्रतिक्षा; डॉक्टर भावे यांचा मृत्यू!

Subscribe

मुंबईत अनेक कोरोनाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या लाईव्हमध्ये मुंबईत बेडची संख्या कमी असल्याचं मान्य केलं होतं. मात्र, आता हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे एका डॉक्टरलाच आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. डॉ. चित्तरंजन भावे असं या डॉक्टरांचं नाव असून त्यांना कोरोनाच्या उपचारांसाठी बेड मिळण्यासाठी तब्बल १० तास वाट पाहावी लागली. मात्र, त्यांनीच सेवा दिलेल्या मुंबईतल्या रहेजा हॉस्पिटलमध्ये त्यांना बेड उपलब्ध होऊ शकला नाही. अखेर उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

डॉ. चित्तरंजन भावे हे कान नाक घसा तज्ज्ञ आहेत. रहेजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी आजपर्यंत अनेकांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. तिथेच काही दिवसांपूर्वी त्यांनी एका कोरोनाच्या रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया केली होती. त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे. मात्र, जास्त त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्यासाठी जेव्हा डॉ. भावे स्वत: कार चालवत रुग्णालयात पोहोचले, तेव्हा मात्र त्यांना स्वत:साठीच बेड मिळू शकला नाही. तब्बल १० तास वाट पाहिल्यानंतर त्यांना बेड उपलब्ध झाला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू ओढवला.

- Advertisement -

दरम्यान, डॉ. भावेंना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, या घटनेमुळे प्रत्यक्ष एका कोरोना योद्ध्याला देखील आणीबाणीच्या परिस्थितीत बेड मिळणं मुंबईथ दुरापास्त होत असेल, तर सामान्य रुग्णांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, याची कल्पना केलेलीच बरी. या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासन अशा दोन्ही यंत्रणांनी मुंबईतल्या बेडच्या उपलब्धतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -