घरमुंबईकोरोनाची लस आहे...कोडगेपणाचं काय ?

कोरोनाची लस आहे…कोडगेपणाचं काय ?

Subscribe

कोरोनाच्या संकटाला एक वर्ष उलटून गेल्यावर लॉकडाऊन, बंद, मास्क, सॅनिटायझर, कोविड, पॉझिटिव्ह, टेस्ट असे शब्द आता जगण्याचे भाग झाले आहेत. कोरोनाची आकडेवारी, त्याच्या बातम्या, पॉझिटिव्ह, मृतांची आकडेवारी न्यूज चॅनलवर झळकणं आता अंगळवणी पडलंय, जगण्यातच एक प्रकारचा कोडगेपणा आलाय, हा कोडगेपणा नाईलाज आहे. इथं असंच असतं, ही व्यवस्था, या वेदना, ही लुबाडणूक, हे हाल असं सगळं सहन करण्याला आपण जगण्याच्या स्पिरीटचं नाव देऊन कोडगेपणाचा सत्कार करण्यात मश्गुल असतो, कुठल्याही गोष्टीचं वैषम्य वाटेनासं झाल्यावर आपण स्वतःला कोडगेभूषण म्हणून मिरवत असतो.

गेल्यावर्षी कोरोनाची नवी नवलाई होती. त्याची भीषणता आणि विदारकता पुरेशी स्पष्ट झालेली नव्हती. नाही म्हणायला, हिंदी किंवा इंग्रजी न्यूज चॅनेल्सवर दाखवले जाणारे कोरोना रुग्णांचे व्हिडिओ आणि समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल व्यक्त होणारी भीती आणि हळहळ आता पूर्णपणे कोडगेपणात रुपांतरीत झाली आहे. हा कोडगेपणा आहे तो कोरोना असण्या किंवा नसण्याविषयीचाही, इथं माणसांचे तीन गट आहेत. एका गटाला वर्षभरापासून वाटतंय की कोविडचा विषाणू हा गंभीर प्रकार आहे. या विषाणूत भारतात आढळलेला नवा बदल जास्त धोकादायक आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन त्यापासून बचाव करायला हवा. दुसरा गट आहे ज्याला असं वाटतंय की कोरोना नावाचा कुठलाही आजार नाही, हा बागुलबुवा औषध कंपन्या आणि सरकारमधल्या काही बड्या धेंड्यांनी उभा केलेला आहे. तिसरा गट आहे त्यांना कोरोना असण्या किंवा नसण्यानं पुरेसा फरक पडत नाही, लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक अडचणींना कसे तोंड द्यावे, घर चालवणे, पोराबाळांच्या पोटापाण्याचा शिक्षणासाठी होणारा खर्च कसा करावा याची रोजची चिंता असणारा हा गट आहे. कुठल्याही संकटात सर्वाधिक प्रभावित होणारा हा गट असतो.

या गटाला मूळ संकटापेक्षा त्याच्या साईडइफेक्ट्सचाच धोका जास्त असतो. लॉकडाऊनच्या या उपासमारीच्या परिणामांपासून जर बचावलो तर कोरोनाच्या मूळ संकटाचा विचार करू….असा त्यांचे रास्त म्हणणे असते. या शिवाय आणखी एक मोठा गट कोरोनाकाळात सर्वाधिक कार्यरत असतो हा गट मंदीचे संधीत आणि संकटाचे धंद्यात रुपांतर करण्यात वाकबगार असतो. हा गट माणसातल्या गिधाडांचा असतो. दुष्काळाच्या संकटकाळात सुन्नपणे जनावरांच्या मरण्याची वाट पाहाणारी ही गिधाडं माणासांसारखीच असतात बोलतात आणि वागतातही…यात अनेकदा काळाबाजारात हरवलेली आणि वस्तूंच्या साठेबाजीत झिंगलेली माणसं नावाची जनावरं असतात. ही गिधाडं कुठल्याही संकटात संधी शोधतात. किंबहुना संकट हीच संधी अशा मोटीव्हेशनल चर्चा, परिसंवाद आणि व्याख्यानांना ही मंडळी गर्दी करतात. गरज ही शोधाची जननी मानली जाते…मात्र इथं गरज निर्माण करण्याचं कसब शिकवलं जातं. घरावर छत नसले तरी चालेल पण झोपड्यावर टेलिव्हिजन डीश असायलाच हवी. कठोर प्रयत्न आणि कष्टाने आपलं दारिद्य्र एकवेळ संपणार नाही…पण अमुक एका कंपनीचा मोबाईल वापरल्यास आपण जगावर राज्य कराल, अशी इस्टमनकलर स्वप्न दाखवलेला आणि या रंगांना कायमच भूललेला देशात एक गट असतो.

- Advertisement -

आपल्या देशात कुठल्याही गोष्टीची नकल होतेच होते. कालच आरटीपीसीआर टेस्टचे किट्स उल्हासनगरात बनवण्यात आल्याचे उघड झाले. ज्या उपासमारीला उपवासाचे नाव दिले जाते त्या दांभिकांच्या देशात सुखाचा भ्रम विकण्याचेही धंदे केले जातात. हे सुख जीवघेण्या आजाराच्या उपचाराच्या दिलासाचाही असू शकते. असे बनावटी टेस्ट किट मुंबईच्या महागड्या फाईव्हस्टार रुग्णालयात वापरले जाणार नाहीत, हे उघड आहेच. मग हे किट कुणासाठी बनवले गेले, तर गोरगरीबांच्या होणार्‍या बोगस कोरोना टेस्टसाठी, आपली टेस्ट होतेय, उपचार होतील, यातच सुख मानून बरं होण्याची इस्टमनकलर स्वप्नं पाहणार्‍यांना त्यांची स्वप्ने 20 ते 25 रुपयांत टेस्ट करून पूर्ण करणार्‍यांनी हे बोगस दिलाशाचं दुकान उघडलं होतं. गेल्या वर्षी भिवंडीत वापरलेले मास्क पुन्हा धुवून वापरण्याच्या प्रयत्नात असलेली एक टोळी पकडली होती. कोरोनाकाळात उपचाराच्या नावाखाली मरण विकणारी दुकानंही फोफावली आहेत. कोरोनाच्या अनाठाई भीतीने हा धंदा वाढवला आहे. यात कोविड टेस्टपासून ते लाखो रुपयांचे उपचार, बेड्सचे भाडे, सुविधा आणि औषधोपचारापर्यंतचा होणार्‍या खर्चाची दुकाने टाकली गेली आहेत. प्रसार आणि समाजमाध्यमांवरील अफवा या भीतीत भर घालत आहेत.

कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्या ही थेट मरणार्‍यांचीच असल्याचा भीतीदायक भ्रम काही माध्यमांमार्फत पसरवला जात आहे. ही भीतीची दुकानेही बोगस औषधोपचाराच्या दुकानांसारखीची धोकादायक आहेत, कारण या दोन्ही ठिकाणी तथ्यापासून फारकत घेण्यात आलेली आहे. मागील वर्षी अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंपनी ही आमच्यासाठी भूषणाह गोष्ट असून आमच्याकडे औषधोपचार वेळीच सुरू होण्यासाठी नागरिकांच्या टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याचे सांगितले होते. या काळात आपल्याकडे भविष्यातील कोरोना संकटाच्या तयारीबाबत आनंदी आनंद होता. थाळ्या, टाळ्या वाजवणे आणि जाहिरातबाजीचे इव्हेंटीकरण करण्यात आपल्याला रस होता. कोरोनाचा दुसरा स्ट्रेन जास्त धोकादायक असून भारतापासून इतर देशांनी आपल्या देशातील नागरिकांनी सावध राहाण्याचा सल्ला विकसित देशांनी इतरांना दिल्याच्या बातम्या आहेत. लोकशाहीत देशाच्या लोकसंख्येपेक्षा इथल्या मतांच्या संख्येचा विचार महत्वाचा असतो, त्यामुळे हे सूत्र आपल्याकडे पुरेपूर पाळले जाते. माणसाचं माणूस असण्यापेक्षा त्याचं मत असणं महत्वाचं मानलं जातं. तिथं कोरोनाबाबतही मत मतांतरे असणारच.

- Advertisement -

ही गोष्ट खरी आहे की कोरोना तरुणांना मोठ्या प्रमाणात होतोय कारण आपल्या देशातील लोकसंख्येच्या प्रमाणात तरुणांची आणि या वयातल्या घराबाहेर पडणार्‍यांची संख्या वयस्कर नागरिकांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. प्रश्न जुन्या कोरोना विषाणूचा नाही, नव्या स्ट्रेनचा आहे. जो भारतात पसरतोय. आणि संख्या जी वाढतेय ती जागतिक आरोग्य संघटना, राज्य, केंद्रातील आरोग्य संघटनेच्या निकषानुसार वाढत असल्याचं म्हटलं जातंय. या संघटनांनीच कोरोना चाचणीचे निकष ठरवले आहेत.

ज्यात निमोनिया, अस्थमा किंवा श्वास, छाती, फुफ्फुसाचा कुठलाही आजार असेल तरी कोविड पॉझिटिव्ह नोंद होतेय. त्यात आरटीपीसीआर अँटीजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह येणं सामान्य बाब झालेली आहे. त्याला कोरोनाशिवाय इतर कारणेही असू शकतात. आरोग्य यंत्रणेतील कोरोना तपासणी करणार्‍यांमध्ये मागील वर्षापासून एक प्रकारची भीती पाहिली गेली आहे. ज्यात जर एखाद्याला निगेटिव्ह रिपोर्ट केलं आणि पुढे ती व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली तर, चुकीचा रिपोर्ट केल्याने नोकरी जाईल. कोविड केंद्र घोषित झालेल्या रुग्णालयांना सरकारकडून आरोग्य सेवा अनुदान आणि आरोग्यासंबंधीत प्रशासकीय सवलती मिळण्याची शक्यता, अशी इतर कारणेही नकारात्मक अर्थाने कोविड रुग्ण संख्या वाढवण्यासाठी कारण ठरू शकतात.

देशात कोरोनाची दुसरी लाट असताना संपूर्ण देशात लॉकडाउन लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिलेले उत्तर पुढची दिशा स्पष्ट करणारे आहे. कोविड 19 संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पुढच्या काळात गरजेनुसार आणखी कडक उपाययोजना केल्या जातील, असे पॉल यांनी स्पष्ट केले. या शिवाय तिसर्‍या लाटेची शक्यताही वर्तवली जात आहे. या सर्व शक्यता, इशा-यांच्या गर्दीत मागील वर्षापासून प्रत्यक्ष कोरोना न झालेल्या मात्र त्याचे साईड ईफेक्ट भोगणार्‍यांची स्थिती दयनीय होत आहे.

आपल्याकडे दुसर्‍याच्या दुःख, अडचणीत किंवा केलेल्या मदतीतही धंदा, शोधणारे विपुल आहेत. ही स्थिती नियंत्रणात यायला वेळ जाईल, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, बेड्स मर्यादित आहेत. त्यामुळे हा लॉकडाऊन अपरिहार्य आहे. कोरोना नाहीच म्हणणं जसं आत्मघातकी आहे तसंच कोरोना आहे म्हणून किरकोळ सर्दी खोकल्यावरही घाबरून खासगी हॉस्पिटलमध्ये जादा पैसे खर्च करून टेस्ट करणंही मूर्खपणा आहे. कोविड त्याचा धोका आणि त्याच्या भीतीचा धंदा या तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपल्या भोवताली हे प्रकार थोड्याबहुत फरकाने सुरू असतील. म्हणून लक्षणं जाणवली तर थेट सरकारी हॉस्पिटल गाठावीत, मला काय होतंय, असं म्हणून अति शहाणपणा करणं धोकादायक शकेल. मागील वर्षभरात कोरोनाच्या भवतालमुळे निर्माण झालेला आपल्यातला कोडगेपणा आपल्या स्वतःलाच नकळत धोक्याच्या खाईत लोटत नाही ना, याची काळजी घ्यायला हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -