घरCORONA UPDATECorona: 'मातोश्री'नंतर राऊत यांच्या 'मैत्री'चाही परिसर सील!

Corona: ‘मातोश्री’नंतर राऊत यांच्या ‘मैत्री’चाही परिसर सील!

Subscribe

राज्यभरात हातपाय पसरवणारा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या दारापर्यंत अर्थात उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्यापर्यंत पोहोचल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. या पार्श्वभूमीवर राज्यभरात आणि विशेष: मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात असतानाच आता शिवसेनेचे आघाडीचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ बंगल्याकडे कोरोनाने आपला मोर्चा वळवला आहे. भांडूप पूर्वमध्ये खासदार संजय राऊत यांचा हा बंगला असून त्यापासून अगदी काही पावलांवर असलेल्या एका इमारतीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला आहे. त्यामुळे प्रशासनासह या भागातल्या सगळ्यांसाठीच ही धोक्याची घंटा ठरली आहे! हा परिसर सील करण्यात आला असून तिथे कोरोनाग्रस्तांचा कसून शोध घेतला जात आहे.

आफ्रिकेतून आल्याचं ‘त्या’नं लपवलं!

भांडूप पूर्व भागातल्या फ्रेंड्स कॉलनीमध्ये बापूसाहेब जुवेकर मार्गावर असलेल्या आरोग्य सदन इमारतीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेला एक इसम वास्तव्याला होता. ही इमारत संजय राऊतांच्या ‘मैत्री’पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या इसमाला काही दिवसांपूर्वी खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्या रुग्णाने एका स्थानिक डॉक्टरांकडे जाऊन त्यावर औषध घेतलं. पण आपण दक्षिण आफ्रिकेहून परतलो आहोत, ही बाब या इसमानं डॉक्टरांपासून लपवली. त्याला तपासल्यानंतर या डॉक्टरांनी इतर ६० जणांची तपासणी करून त्यांना औषधं दिली. पण आता हा दक्षिण आफ्रिकेतून परतलेला इसमच कोरोना बाधित झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच पाचावर धारण बसली असून संबंधित डॉक्टर आणि त्यांनी तपासलेल्या इतर ६० रुग्णांना देखील तातडीने क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, हे डॉक्टर मुंबईतल्या एका उच्चभ्रू संकुलात १४व्या मजल्यावर राहतात. तिथे देखील आता मुंबई महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी पोहोचले असून पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे. त्याशिवाय, संजय राऊत यांच्या बंगल्याकडे जाणारे रस्ते आणि आसपासच्या भागात आरोग्य पथकाने कोरोना बाधितांची शोधमोहीम सुरू केली आहे. या बंगल्यात सध्या संजय राऊत यांचे धाकटे बंधू आणि आमदार सुनील राऊत वास्तव्याला आहेत.

‘मातोश्री’बाहेरच्या परिसरात कसून शोध

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यापासून काही पावलांवर असलेल्या एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातले सुरक्षा कर्मचारी आणि इतर व्यक्ती याच ठिकाणी चहा पिण्यासाठी येत असत. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री बंगल्यावरच्या तब्बल १७० सुरक्षा कर्मचाऱ्यांना बदलण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. तसेच, बंगल्याच्या आसपासच्या परिसरात कसून शोधमोहीम हाती घेण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -