घरCORONA UPDATEदादर, धारावी, माहीम विभागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

दादर, धारावी, माहीम विभागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

Subscribe

२८ फेब्रुवारी रोजीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १४,१९७, १२ मार्च रोजीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १४,५६९

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दादर, धारावी व माहीम या तीन विभागात गेल्या १२ दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल ३७२ ने वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दादर, धारावी व माहीम विभागात खास उपाययोजना राबविण्याची आवश्यकता भासणार आहे. ज्या वेळी मुंबईत धारावी विभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढून धारावी विभाग हा कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ झाला होता, त्यावेळी मुंबई महापालिका आयुक्त पदावरून प्रवीण परदेशी यांची गच्छंती होऊन इकबाल चहल यांनी नव्याने सूत्रे हाती घेतली. त्यावेळी चहल व सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी युद्धपातळीवर विविध उपाययोजना राबवून धारावीला ‘ हॉटस्पॉट’ मधून बाहेर काढले होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने दादर, धारावी, माहीम विभागात आपले डोके वर काढल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या २८ फेब्रुवारी रोजीपर्यंत दादर, धारावी व माहीम या तीन विभागात मिळून कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ हजार १९७ एवढी होती. तर सक्रिय रुग्णांची संख्या ३६३ एवढी होती.

मात्र आज १२ मार्च रोजीपर्यँत या तीन विभागातील कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेतल्यास कोरोना रुग्णांची संख्या १४ हजार ५६९ वर गेली आहे तर सक्रिय रुग्णांची संख्या ५१४ वर गेली आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांत या तीन विभागातील एकूण रुग्ण संख्येत ३७२ ने तर सक्रिय रुग्णांच्या संख्येत १५१ ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या वाढलेल्या ३७२ रुग्णांमध्ये, दादरमध्ये वाढलेल्या १०८ रुग्णांचा, धारावीमधील १२४ आणि माहीममधील १४० रुग्णांचा समावेश आहे. १५१ सक्रिय रुग्णांची जी वाढ झाली आहे, त्यामध्ये दादरमधील ३२, धारावीतील – ५३ आणि माहीममधील ६६ रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -