घरCORONA UPDATEकोरोनाच्या रुग्णांची, मृतांच्या आकड्यांचे विश्लेषण करणाऱ्याला कोरोनाने गाठले

कोरोनाच्या रुग्णांची, मृतांच्या आकड्यांचे विश्लेषण करणाऱ्याला कोरोनाने गाठले

Subscribe

कोरोनाच्या रुग्णांसह मृतांच्या आकड्यांचे विश्लेषण करणाऱ्या आणि माजी आयुक्तांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या एका खासगी अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाली आहे.

संपूर्ण मुंबईत कोरोनाचा हाहाकार सुरु असतानाच महापालिका मुख्यालयातच कोरोनाचा शिरकाव सुरु झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांसह मृतांच्या आकड्यांचे विश्लेषण करणाऱ्या आणि माजी आयुक्तांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या एका खासगी अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे हा खासगी अधिकारी महापालिकेतील काही सनदी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याने त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, या सनदी अधिकाऱ्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. परंतु याबरोबरच आता कोरोनाचा नियंत्रण कक्षातील पाच कर्मचाऱ्यांसह मुख्यालयातील सुरक्षा रक्षक व कर्मचारीही आता कोरोनाचे शिकार होवू लागले आहेत.

मुंबई महापालिका मुख्यालयात बुधवारी सुरक्षा खात्याचे तीन जवानांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गुरुवारी आणखी दोन जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या सर्वांना नायर रुग्णालयात तर एकाला कल्याण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर महापालिका मुख्यालयात पहिला कोरोनाचा रुग्ण हा आपत्कालिन नियंत्रण कक्षातच आढळून आला होता. त्यानंतर येथील कोरोना नियंत्रण कक्ष हा वडाळा येथील आपत्कालिन कक्षाच्या इमारतीत हलवण्यात आला आणि मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर आणखी दोन सफाई कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. परंतु त्यानंतर या नियंत्रण कक्षातील क्वारंटाईन केल्यानंतरही आणखी पाच कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नियंत्रण कक्षातील कर्मचारी हे हॉटेल ते मुख्यालय असाच प्रवास करत असून दोनच दिवसांपूर्वी केलेल्या चाचणीत पाच कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये काही ऑपरेटर्सचा समावेश आहे.

- Advertisement -

याबरोबरच माजी आयुक्तांचा अत्यंत विश्वास असलेल्या एका खासगी विश्लेषक अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. याच खासगी व्यक्तीच्या आधारे माजी आयुक्त आपला कारभार हाकत होते आणि महापालिकेच्या सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त यांना जुमानत नव्हते. खासगी अधिकारी असूनही आयुक्तांनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे तो महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही बॉसिंग करत होता. या खासगी अधिकाऱ्यासोबतच माजी आयुक्तांचा सर्वात लाडका सनदी अधिकारीचे बसणे, उठणे होते. त्यामुळे खासगी अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच, सर्व क्वारंटाईनची व्यवस्था पाहणाऱ्या सर्वात ज्युनियर अधिकारी असलेल्या त्या सनदी अधिकाऱ्याची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने ती निगेटिव्ह आली. परंतु त्या खासगी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व फेलोंमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. याबरोबरच मुख्यालयातील दक्षता विभागातील एका महिला कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला नवी मुंबईत राहणारी आहे. मात्र, त्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने कामावर येत नव्हत्या. परंतु दोन दिवसांपूर्वी त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -