Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई कोरोना निर्बंधांमध्ये सूट नाही !

कोरोना निर्बंधांमध्ये सूट नाही !

सर्वसामान्यांना लोकलप्रवास लांबच * दुकाने, हॉटेल मालकांच्या पदरी निराशा

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका पाहता राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या निर्बंधांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी जाहीर केले. त्यामुळे आता सर्वसामान्यांना लोकल प्रवास अद्यापही दूर असून व्यापारी, हॉटेल मालक यांच्या पदरी निराशा पडली आहे. दुकाने, हॉटेलांना वेळ वाढून देण्याची मागणी व्यापारी आणि हॉटेल मालक मागील काही दिवसांपासून सातत्याने करत होते. मात्र, आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे आता वेळेत कोणताही बदल होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसर्‍या लाटेचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. त्यातच आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्र आणि केरळ राज्यामधील कोरोना स्थितीबाबत चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य पथके महाराष्ट्र आणि केरळमध्ये दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी कोरोना निर्बंधांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. राज्यात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर आमचा भर असणार आहे. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. मात्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसी या केंद्र सरकारकडून मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचे राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ऑगस्ट महिन्यात ४ कोटी लसी उपलब्ध होतील. सध्या राज्यात होणारा लसींचा पुरवठा हा कमी आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर विना राज्यात प्रवेश देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात बर्‍यापैकी लसीकरण झाले आहे. त्यामुळे बुधवारच्या कॅबिनेटच्या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता दिली जाईल आणि लोकल ट्रेनही सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येतील अशी चर्चा होती. मात्र, कॅबिनेटने निर्बंधात कोणतीही शिथिलता दिली नसल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यात दररोज 7 ते 9 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे निर्बंधात शिथिलता देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -