Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE CoronaVirus : आता तर हद्दच झाली; पोलीस आयुक्तांच्याच नावाने अफवा!

CoronaVirus : आता तर हद्दच झाली; पोलीस आयुक्तांच्याच नावाने अफवा!

करोनाबाबतच्या अफवांना सध्या पीक आलं असून आता चक्क मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याच नावाने अफवा पसरवल्या जात आहेत.

Related Story

- Advertisement -

राज्यात आणि मुंबईत करोना हळूहळू हातपाय पसरू लागलेला असताना करोना आणि त्यासंदर्भात सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर अफवांचं पीक सध्या उठलं आहे. कधी ती संचारबंदीबाबत असते, तर कधी सापडलेल्या रुग्णांबाबत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदी लागू केल्यापासून तर काय मिळू शकेल आणि काय मिळणार नाही, यावर तर असंख्य अफवा उठल्या आहेत. त्यात एकानं तर हद्दच करत थेट मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याच नावे एक पोस्ट व्हायरल करून भलतीच माहिती शेअर केली. त्यावर काही वृत्तवाहिन्यांनी बातम्या देखील दाखवल्या. अखेर पोलीस आयुक्तांनाच ही अफवा असून त्यावर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन करावं लागलं.

अफवा सांगते, वस्तू खरेदीचं टाईमटेबल!

आज सकाळपासून सोशल मीडियावर मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या नावाने एक मेसेज भलताच व्हायरल झाला होता. यामध्ये दूध, वर्तमानपत्र, भाजीपाला, किराणा आणि मेडिकल दिवसाच्या कोणत्या वेळेत खुले राहतील, याची माहिती होती. या मेसेजनुसार सकाळी ६ ते ८ या वेळेत दूध मिळेल, ७ वाजेपर्यंतच वर्तमानपत्र मिळेल आणि भाजीपाला, किराणा, मेडिकल सकाळी ८ ते ११ या वेळेतच खुली राहतील आणि तेही फक्त २४, २६, २८ आणि ३० मार्च या दिवशी!

- Advertisement -

‘शंका असेल, तर थेट आम्हाला विचारा’

पण हा मेसेच फेक असल्याचं खुद्द पोलीस आयुक्तांनीच ट्वीट करून सांगितलं आहे. ‘व्हायरल होत असलेल्या मेसेजमधली
माहिती ही माझ्या निर्देशांनुसार बनवण्यात आलेली नाही. करोनासारख्या गंभीर संकटात अशा अफवांवर विश्वास ठेऊन त्या व्हायरल करणं आपल्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे अशा अत्यावश्यक सेवांसंदर्भातला कोणताही मेसेज पुढे
पाठवण्याआधी त्याची खातरजमा करून घ्या’, असं ट्वीट पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलं आहे. शिवाय, जर कोणत्या मेसेजबद्दल खात्री करून घ्यायची असेल, तर तो ट्वीटवर आम्हाला पाठवा, आम्ही त्याची सत्यता सांगू, असं ट्वीट मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर करण्यात आलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, संचारबंदीमध्येही महाराष्ट्रात अत्यावश्य सेवा सुरू राहणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संचारबंदीची
घोषणा करताना सांगितलं होतं. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता सुपरमार्केट किंवा भाजीमार्केटमध्ये गर्दी करून एकाच वेळी अनेक दिवसांचं सामान भरण्याची घाई करू नये, असं आवाहन सरकार आणि प्रशासन अशा दोघांकडून वारंवार केलं जात आहे.


हेही वाचा – कृपा करून घराबाहेर पडू नका, घाबरून दुकानांत गर्दी करू नका-अजित पवार
- Advertisement -