भिवंडीत कोरोनाने घेतला पोलिसाचा पहिला बळी!

Police

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आजही अहोरात्र काम करणार्‍या पोलीस दलात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बंदोबस्त, नाकाबंदी तसेच लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची जबाबदारी, ई-चलन या सर्व जबाबदार्‍या चोखपणे पार पाडणार्‍या पोलीस दलावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. आता भिवंडीत पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाने बळी गेलेला भिवंडीतील हा पहिला पोलीस मृत्यू आहे.

भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ – २ क्षेत्रातील भोईवाडा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेले भगवान पांडुरंग वांगड( ४८)यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोरोनाने भिवंडीत पोलिस कर्मचाऱ्याचा पहिलाच बळी गेला असून या घटनेने पोलीस वर्तुळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भगवान वांगड हे टेमघर येथे आपल्या कुटुंबियांसह राहत असताना मुलाची प्रकृती बरी नसल्याने मागील दहा दिवसांपासून सुट्टीवर होते. मंगळवारी सकाळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना पोलीस प्रशासनातर्फे ठाणे येथील वेदांत रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू असतानाच त्यांची अचानक ऑक्सीजन पातळी खालावल्याने त्यांना तात्काळ स्व.इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्व पोलीस वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


हे ही वाचा – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, नवनीत राणा यांची मागणी