घरCORONA UPDATECorona Update : घरोघरी कोरोना चाचणी शक्य; अर्ध्या तासात अहवाल

Corona Update : घरोघरी कोरोना चाचणी शक्य; अर्ध्या तासात अहवाल

Subscribe

आता घरच्या घरीच कोरोना चाचणी करून अवघ्या अर्ध्या तासात अहवाल मिळणे शक्य होणार आहे.

कोरोनाला आटोक्यात ठेवण्यासाठी घरोघरी जाऊन चाचणी करणे आणि तातडीने अहवाल मिळणे आवश्यक असल्याचे मत नेहमीच तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येते. परंतु हे शक्य नसल्याचे सांगण्यात येते. मात्र आता घरच्या घरीच कोरोना चाचणी करून अवघ्या अर्ध्या तासात अहवाल मिळणे शक्य होणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) संशोधक डॉ. श्याम सुंदर नंदी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आरटी-लॅम्पच्या पद्धतीने अवघ्या अर्ध्या तासात कोरोनाचा अहवाल मिळू शकतो हे सिद्ध केले आहे. आरटी लॅम्पचा आकार फारच लहान असल्याने घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे.

कोरोना चाचणीसाठी सध्या आरटी-पीसीआर या तंत्राचा वापर केला जात आहे. यासाठी लागणार्‍या मशीन्स उचलून नेणे शक्य नसल्याने घरोघरी जाऊन कोरोना चाचणी करणे शक्य होत नाही. तसेच आरटी-पीसीआर पद्धतीने एकाच वेळी ४८ पेक्षा अधिक चाचण्या केल्या जात असल्याने त्याचा अहवाल मिळण्यासही वेळ लागतो. आयसीएमआरचे संशोधक डॉ. श्याम नंदी व त्यांच्या सहकार्‍यांनी आरटी-लॅम्प तंत्राचा वापर करून विकसित केलेल्या पद्धतीमुळे अवघ्या अर्ध्या तासामध्ये कोरोना चाचणीचा अहवाल मिळणे शक्य झाले आहे. त्यासाठी लागणारे यंत्र हे फारच लहान असून, एका व्यक्तीला सहज उचलून नेता येणारे आहे.

- Advertisement -

आरटी-पीसीआरमध्ये तीन वेगवेगळ्या तापमानामध्ये चाचणी करावी लागते. याउलट आरटी लॅम्पमध्ये ६० डिग्री सेल्सियस या तापमानातच चाचणी केली जाते. आरटी लॅम्पमध्ये करण्यात येणार्‍या रासायनिक प्रक्रियेमध्ये टेस्ट ट्यूबमधील स्वॅब असलेल्या रसायनाचा रंग अर्ध्या तासामध्ये बदलतो. गुलाबी रंग पिवळा झाल्यास संबंधित व्यक्तीच्या शरीरात कोरोनाचे विषाणू असल्याचे स्पष्ट होते.

ही प्रक्रिया रुग्णाच्या डोळ्यांसमोर होत असल्याचे आयसीएमआरकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लॅब टेक्निशियनने संशयित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याचा स्वॅब घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरातच चाचणीच्या सर्व प्रक्रिया करून अवघ्या अर्ध्या तासामध्ये कोरोना अहवाल त्या व्यक्तीच्या हातात देऊ शकेल. या तंत्रज्ञानासाठी आयसीएमआरने नुकतेच देशातील कंपन्यांकडून हे मशीन बनवण्यासाठी इक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवण्यात आला आहे. त्याला देशातील तब्बल १३ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. यातून पाच कंपन्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

- Advertisement -

सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोना संक्रमित रुग्ण शोधण्यासाठी वापरण्यात येणार्‍या आरटी-पीसीआर पद्धतीने भारतामध्ये दिवसाला ७ लाख ४० हजार चाचण्या केल्या जात आहेत. कमीतकमी यंत्रणेमध्ये तातडीने कोरोना चाचण्या व्हाव्यात यासाठी भारतासह जगातील सर्वच देश प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीमध्ये आरटी लॅम्प ही पद्धती एक आशेचा किरण ठरली आहे.

आरटी-लॅम्प पद्धतीची वैशिष्ट्ये
  • रासायनिक प्रक्रियेसाठी एकच तापमान
  • यामध्ये पीसीआर किंवा आरटी-पीसीआरप्रमाणे थर्मल सायकलरची आवश्यकता नाही
  • गुणात्मक चाचणी
  • चाचणी पूर्ण होण्यासाठी अवघी ३० मिनिटे लागतात
  • या चाचणीसाठी स्वॅबमधील दोन जीनचा वापर केला जातो
  • चाचणीचा अहवाल नजरेसमोर असतो. त्यासाठी कोणत्याही यंत्रणेची आवश्यकता नाही

 

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -