घरCORONA UPDATECorona Update : वेल डन मुंबईकरांनो! दादर, धारावी, माहीममध्ये रुग्णसंख्येत घट

Corona Update : वेल डन मुंबईकरांनो! दादर, धारावी, माहीममध्ये रुग्णसंख्येत घट

Subscribe

मुंबई महानगरपालिकेने युद्धपातळीवर केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आज मुंबईत रुग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबईमध्ये फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने युद्धपातळीवर केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आज मुंबईत रुग्णसंख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. दादर, माहीम आणि धारावी या भागांतही रुग्णसंख्येत चांगलीच घट झाली आहे. ही बाब फक्त दादर, माहीम, धारावीकरांसाठीच नव्हे, तर सर्व मुंबईकरांसाठी दिलासा देणारी आहे. मुंबईमध्ये आज ५८६७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. हा आकडा मागील काही दिवसांच्या तुलनेत खूप कमी होता.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ सुरू होती. मुंबई शहर व उपनगरात काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागला. परिणामी, रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली. त्यामुळे पालिका, सरकारी व खासगी रुग्णालयात गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोना रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले होते. आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड व अगदी साधा बेड मिळणेही खूप अवघड झाले.

- Advertisement -

या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर विविध उपाययोजना सुरू केल्याने गेल्या काही दिवसांत मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या जिथे ९ हजारांवर गेली होती, ती रुग्णसंख्या आज ५८६७ वर आली आहे. तर धारावी, दादर व माहीम या विभागात मिळून कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत दररोज किमान २१३ ते २२६ पर्यंत आढळून येत होती, ती संख्या आता १५५ वर आली आहे. यावरून आरोग्य यंत्रणेने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांना काही प्रमाणात यश असल्याचे दिसते.

धारावी, दादर व माहीम या तिन्ही विभागांत मिळून १७ एप्रिल रोजी २४८ रुग्ण, १८ एप्रिल रोजी २२५ रुग्ण, १९ एप्रिल रोजी २४५ रुग्ण, २० एप्रिल रोजी १८६ रुग्ण, २१ एप्रिल रोजी २१५ रुग्ण, २२ एप्रिल रोजी २५४ रुग्ण, २३ एप्रिल रोजी २१३ रुग्ण संख्या आढळून आली आहे. मात्र, त्या तुलनेत आज २४ एप्रिल रोजी दादर, धारावी व माहीम या विभागात मिळून केवळ १५५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

- Advertisement -

त्यामुळे गेल्या सात दिवसांतील रुग्णसंख्येची सरासरी पाहिल्यास दररोज किमान २२६ रुग्णांची नोंद झाल्याची बाब समोर येते. या तुलनेत आज दादर, धारावी व माहीम या तिन्ही भागात मिळून केवळ १५५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ही बाब या तिन्ही विभागांसाठी दिलासादायक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -