मुंबईला हव्या असलेल्या लसीचा मुबलक पुरवठा करण्यासाठी पालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरला ११ पुरवठादारांनी प्रतिसाद दिला. मात्र, त्यापैकी एकाने माघार घेतली आहे. त्यामुळे आता १० पुरवठादार रिंगणात असून अद्याप एकानेही लस उत्पादक कंपनीशी लसीच्या पुरवठ्याबाबत केलेल्या कराराची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशी माहिती आज स्थायी समितीच्या बैठकीत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली. त्यामुळे आता मुंबईला लसीचा पुरवठा कधी, कसा आणि कोणाकडून होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईतील लसीकरण आता १०० टक्के कसे पूर्ण होणार, असा सवालही भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
प्रभाकर शिंदे यांनी मुंबई महापालिकेने लसीच्या पुरवठ्याबाबतचा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. पालिकेने मुंबईकरांसाठी लस खरेदीकरिता काढलेल्या ग्लोबल टेंडरची सद्यस्थिती काय आहे? किती दिवसात लस पुरवठा होणार? किती संख्येने लस पुरवली जाईल? लसीचा दर काय? अशी एकामागोमाग प्रश्नांची सरबत्ती करीत प्रभाकर शिंदे यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारला.
मुंबईकरांचे तातडीने लसीकरण झाल्यास कोरोनाची संभाव्य तिसरी लाट वेळीच रोखता येईल. मात्र, सध्या लस उपलब्ध नसल्याने शहरातील ८० टक्के लसीकरण केंद्रे बंद आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून अनेकांना लसीकरण केंद्रावरून लस न घेता माघारी जावे लागत आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या अनेक वयस्कर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातून मुंबईतील लसीकरण मोहिमेचे नियोजन बिघडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबत पालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलत समस्त मुंबईकरांसाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केले.
लस पुरवठ्याबाबत स्पष्टता नाही – पालिका
याबाबत उत्तर देताना पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी ग्लोबल टेंडरला ११ जणांनी प्रतिसाद दिला असून त्यापैकी एकाने माघार घेतल्याचे सांगितले. तसेच १० पैकी एकाही लस उत्पादक कंपनीचा प्रस्ताव आलेला नाही. या सर्व निविदाकारांनी स्पुटनिक लस वितरणाचा दावा केला आहे. परंतु, अद्याप एकही निविदाकार लस उत्पादकाबरोबर लस पुरवठ्याबाबत केलेल्या करारनाम्याची प्रत देऊ शकलेला नाही. त्यामुळे लसीचा पुरवठा नेमका कसा होणार याची अद्याप स्पष्टता झालेली नाही. प्रशासन याबाबत दोन ते तीन दिवसात अंतिम निर्णय घेणार आहे, अशी माहिती वेलारासू यांनी दिली असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.