Corona Vaccination : दादरचे ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र बंद; पर्याय आता स्टेडियम, खुल्या मैदानांचा

पालिकेने मुंबईमधील स्टेडियम, मोकळ्या मैदानांवर हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा 'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र' उपक्रमाला चालना मिळणार आहे.

drive in vaccination center
ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिका लसीकरणावर भर देत आहे. त्यामुळे पालिकेने दादर येथे खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ दोन दिवसांपूर्वी सुरू केले. मात्र, आरटीओची परवानगी नसल्याने पालिकेला राज्यातील हा पहिलाच उपक्रम नाईलाजाने बंद करावा लागला आहे. आता त्यावर पर्यायी उपाययोजना म्हणून पालिकेने अंधेरी स्पोर्ट्स क्लब ग्राऊंड, कूपरेज ग्राऊंड, शिवाजी स्टेडियम, ओव्हल मैदान, ब्रेबॉर्न स्टेडियम, एमआयजी क्लब मैदान, एमसीए ग्राऊंड, रिलायन्स जिओ गार्डन, वानखेडे स्टेडियम, संभाजी उद्यान मुलुंड, सुभाष नगर ग्राऊंड चेंबूर, टिळक नगर ग्राऊंड चेंबूर, घाटकोपर पोलीस ग्राऊंड, शिवाजी मैदान चुनाभट्टी या ठिकाणावर मोकळ्या मैदानात हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भतील माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम जोमात सुरू आहे. अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी उसळत आहे. त्यामुळे पालिकेवर टीका होत आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेऊन दोन दिवसांपूर्वीच ज्या नागरिकांना चालता येत नाही अशा ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिक, तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी दादर, कोहिनुर स्क्वेअर येथे पार्किंग लॉटमध्ये लसीकरण केंद्र सुरु केले. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मात्र, त्यामुळे तेथील परिसरात वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे आरटीओने त्याची गंभीर दखल घेतली. त्यामुळे दादर येथील हे ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ बंद करण्यात आले आहे.

आता त्यावर पर्यायी उपाययोजना म्हणून पालिकेने मुंबईमधील स्टेडियम, मोकळ्या मैदानांवर हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पुन्हा एकदा ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ उपक्रमाला चालना मिळणार आहे. दादर येथील केंद्रावरून आरटीओने पालिकेचे कान टोचल्याने पालिका प्रशासनाने याबाबत अधिक खबरदारी घेतली आहे. मैदानात जाण्यासाठी आणि लस घेऊन बाहेर पडणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात येणार आहे. मैदान अथवा स्टेडियम परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.

लसीकरण करताना एका रांगेत जाण्यासाठी सदर ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात येणार आहेत. मैदाने आणि स्टेडियममध्ये लसीकरणासाठी तात्पुरते शेड उभारण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी माेबाईल टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच लसीकरण करण्यासाठी नोंद झालेल्या व ६० वर्षांवरील व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे, असे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले असून याबाबत समन्वयाची जबाबदारी पालिका उपायुक्तांवर सोपविण्यात आली आहे.