घरमुंबईमुंबईत सोमवारी अनेक रुग्णालयात लस पोहचलीच नाही, ठिकठिकाणी गोंधळाचे वातावरण

मुंबईत सोमवारी अनेक रुग्णालयात लस पोहचलीच नाही, ठिकठिकाणी गोंधळाचे वातावरण

Subscribe

मुंबई महानगरपालिकचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईला दीड लाख लसींचा साठा मिळाल्याचा निरोप काल प्रसारमाध्यामांना दिला खरा, मात्र सोमवारी सकाळी प्रत्यक्षात महापालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये लसीकरणावरून पूर्ता गोंधळ निर्माण झाला होता. मागील दोन दिवस मुंबईत लसींचा पुरवठा न झाल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद होती. त्यामुळे सोमवारी सकाळी १३२ लसीकरण केंद्रांवर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना लस न मिळाल्याने हात हलवत घरी परतावे लागले. मुंबई शहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगर भागातील अनेक लसीकरण केंद्रांवर लसींचा साठा न पोहल्याने केंद्रांबाहेर ‘आऊट ऑफ स्टॉक’चे बोर्ड लागले आहेत. मुंबईतील डॉ. शिरोडकर हॉस्पीटल, कूपर हॉस्पीटलसह अनेक हॉस्पीटल्समध्ये लसीचा तुटवडा होता.

दरम्यान रविवारी रात्री पालिकेने लसीचे १ लाख ५८ हजार डोस मुंबईला मिळाले असल्याचे जाहीर केले. शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू होईल असेही पालिकेने स्पष्ट केले. यामुळे सोमवार ते (२६ एप्रिल ते २८ एप्रिल २०२१) बुधवार असे किमान तीन दिवस मुंबईतील लसीकरण सुरळीत होण्यास मदत होणार आहे असे पालिकेने सांगितले, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे. आज अनेक लसीकरण केंद्रांवर अद्याप लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, पालिकेने जाहीर केलेल्या परिपत्रकात असेही सांगितले होते की, मुंबईला मिळालेल्या लस साठ्यात कोव्हॅक्सिन लसीचा साठा अतिशय मर्यादीत असल्याने मोजक्याच केंद्रांवर आणि त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे.

यात महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे ५९ लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३२ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेवून दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे. असे पालिकेने जाहीर केले होते.

- Advertisement -

महानगर पालिकेला रविवारी कोविशिल्ड लसीचे १ लाख ५० हजार तर कोव्हॅक्सिन लसीचे ८ हजार अश्या एकूण १ लाख ५८ हजार डोस प्राप्त झाले आहेत. हा साठा महानगरपालिकेच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवण केंद्रात नेण्यात आला आहे. मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच, त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात येणार असे पालिकेने स्पष्ट केले.

दरम्यान लस साठा उपलब्ध झाल्याने पुढील किमान तीन दिवस खासगी केंद्रांना देखील लसीकरण मोहीम राबवता येईल. तसेच लस साठा प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत पालिका विविध केंद्रांवर लस वितरण करत होती मात्र ज्या लसीकरण केंद्रांवर लस साठा उपलब्ध झाला नाही त्यांना आज सकाळी ८ वाजेपासून लस साठा नेता येईल असे पालिकेने जाहीर केले होते. तसेच पालिकेनेही आज (२६ एप्रिल २०२१) रोजी काही केंद्रांवर लसीकरण प्रत्यक्ष उशिराने सुरू होण्याची शक्यता असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मुंबईसह मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक केंद्रांवर लसींचा साठा अद्याप उपलब्ध न झाल्याने लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याचे कारण सांगत नागरिकांना घरी पाठवले जात आहे.


राज्यात ६४ हजार कोरोना बळींंनंतर, आरोग्य विभागाचा Oxygen Plant चा प्रस्ताव

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -