घरताज्या घडामोडीनवी मागणी : 'करोना व्हायरस' साठी मुंबईकरांना जास्त पाणी सोडा!

नवी मागणी : ‘करोना व्हायरस’ साठी मुंबईकरांना जास्त पाणी सोडा!

Subscribe

करोना व्हायरसमुळे हात धुण्याचं प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी तुटवडा होऊ नये, म्हणून मुंबईत जास्त पाणीपुरवठा केला जावा, अशी मागणी मुंबई महानगर पालिकेत भाजप नगरसेवकाकडून केली गेली आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना अधिक पाणी पुरवठा करण्याची मागणी भाजपने केली आहे. करोना व्हायरसबाबत जनजागृती करताना महापालिकेने नागरिकांना हात साबणाने स्वच्छ धुण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे याकरता पाण्याचा अधिक वापर होणार असल्याने या कालावधीत महापालिकेने जास्त पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी भाजप नगरसेवक हरिष भांदिर्गे यांनी महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे.

हात धुण्यासाठी पाणी हवंच!

चीन, थायलंड, हाँगकाँग, सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, नेपाळ, इंडोनेशिया, इराण आणि इटलीमध्ये पसरलेल्या करोना व्हायरसमुळे आपल्या देशात भीतीचे सावट पसरले आहे. देशाच्या राजधानीत अशा प्रकारच्या आजारांच्या संशयित रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातही करोना व्हायरस रोखण्यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासंदर्भात मुंबई महापालिका आणि राज्य शासनाचे आरोग्य विभाग यांच्यामार्फत जनजागृती केली जात आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हस्तांदोलन पद्धत बंद करणे आणि नागरिकांनी शिंकताना आणि खोकताना तोंडाला रुमाल लावणे असे आवाहन केले जात आहे. मात्र, याबरोबरच नागरिकांनी जास्तीत जास्त साबणाने हात स्वच्छ धुण्याचेही आवाहन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही साबणाने हात धुण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

- Advertisement -

पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो!

हँड सॅनिटायझरचा वापर लोकांकडून तितकासा केला जात नाही किंबहुना त्याचा तुटवडाही निर्माण झालेला आहे. परिणामी नागरिक सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून सातत्याने साबणाने धुवू लागले आहेत. या वारंवारच्या हात धुण्यासाठी पाण्याचा वापर अधिक होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाण्याचीही समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे करोना व्हायरसचा धोका लक्षात घेता या कालावधीकरता पाण्याचा पुरवठा अधिक वाढवला जावा, अशी मागणी भांदिर्गे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.


हेही वाचा – करोनाच्या नावाखाली सुट्टया घेणे पडले महाग, जेलमध्ये रवानगी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -