महाड तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव

विन्हेरे माध्यमिक शाळेतील, दोन शिक्षकांसह १७ विद्यार्थ्यांना कोरोना

गेले काही दिवस मोठ्या शहरातून कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच महाड तालुक्यामध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे उघड झाले आहे. तालुक्यातील विन्हेरे येथील माध्यमिक शाळेतील दोन शिक्षक व १७ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेली दोन वर्षे संपूर्ण राज्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. नुकत्याच शाळा सुरू होवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गाडी रुळावर येत असतानाच पुन्हा कोरोनाचा फैलाव सुरू झाला आहे. मात्र, याही परिस्थितीत महाड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले नव्हते. जिल्ह्यात महाड तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या शून्य होती. तालुक्याचा दैनंदिन कारभारही व्यवस्थित सुरू असतानाच आता कोरोनाने पुन्हा प्रवेश केला आहे. विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेमध्ये एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये शाळेतील दोन शिक्षक व सतरा विद्यार्थी एकाच वेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्य विभागाने तातडीने या ठिकाणी १७४ विद्यार्थ्यांच्या अँटिजेन टेस्ट केल्या. तसेच ही शाळा त्वरीत बंद करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणारे संबंधित शिक्षक व विद्यार्थी यांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरीही त्यांच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची लक्षणे दिसत नाहीत. या परिसरामध्ये तसेच तालुक्यामध्ये इतर ठिकाणीही आरोग्य विभाग सतर्क असल्याचे महाड तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावडेकर यांनी सांगितले.

महाडच्या या घटनेनंतर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील इयत्ता ९ वी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार महाड तालुक्यातील शाळा देखील पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.