मुंबईत फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये रुग्ण संख्येत साडेपाच टक्के वाढ, मृतांची संख्या दुप्पट

Corona virus in mumbai In Mumbai, the number of patients increased by 5.5 per cent in March as compared to February
मुंबईत फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये रुग्ण संख्येत साडेपाच टक्के वाढ, मृतांची संख्या दुप्पट

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत जास्त वाढला आहे. फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्ण संख्या १७ हजार ४७३ व मृतांची संख्या ११५ होती. त्या तुलनेत मार्च महिन्यात कोरोना रुग्ण संख्या ९६ हजार ५९० एवढी आढळून आली आहे तर मृतांची संख्या २३० वर गेली आहे. त्यामुळे तुलनात्मक भाग पाहिल्यास गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत रुग्णसंख्या ७९ हजार ११७ ने वाढली आहे. म्हणजेच साडेपाच टक्के वाढ झाली आहे. तर रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये दुप्पट झाला आहे.

मुंबईत जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनावर पालिकेने चांगले नियंत्रण मिळवले होते. मात्र नागरिकांच्या व विशेषतः बार, पब, थिएटर, मॉल्स, बाजारपेठ, लग्न सराईत जाऊन गर्दी करणाऱ्यांच्या बेफिकीरीपणामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन गेल्या रविवारपासून मुंबईसह राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत संचारबंदी लागू केली आहे. जर त्यानंतरही कोरोना रुग्णांनाच्या संख्येत भरमसाठ वाढ होत राहिली तर सरकार व पालिकेला आणखीन कठोर म्हणजे लॉकडाऊनचे पाऊल उचलावे लागणार आहे, हे निश्चित.

  • फेब्रुवारीत रुग्ण संख्या १७,४७३; मृतांची संख्या ११५
  • मार्चमध्ये रुग्ण संख्या ९६,५९०; मृतांची संख्याव २३०
  • राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या टेन्शनमध्ये वाढ

मार्च महिन्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ

जानेवारी महिन्यापर्यंत पालिकेने विविध उपाययोजना करून कोरोनावर चांगलेच नियंत्रण मिळवले होते ; मात्र नागरिकांचा बेफिकीरीपणा अधिकच वाढला आणि परिणामी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ व्हायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मार्च महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गेल्या वर्षभरात १ एप्रिलपर्यंत कोरोनाचे ४ लाख २३ हजार ३६० रुग्णांची नोंद झाली होती. मात्र मार्च २०२१ मध्ये एकाच महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ९६ हजार ५९० एवढी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरातील रुग्ण संख्या आणि आताच्या एका मार्च महिन्यातील रुग्ण संख्या तुलनात्मक तपासल्यास गेल्या वर्षभरातील रुग्ण संख्येच्या तुलनेत २५% पेक्षाही जास्तीने वाढ झाल्याचे निदर्शनास येते.

पालिका बेडच्या संख्येत वाढ करणार

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढीचा वेग पाहता मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत संचारबंदी लागू केली आहे तसेच, पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, सरकारी, पालिका, खासगी रुग्णालयात यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच, पालिका बेडची संख्या २५ हजारांपर्यंत वाढविण्याच्या विचारात आहे.

मुंबईत १ एप्रिलच्या आकडेवारीनुसार १३९३६ सक्रिय रुग्ण आहेत. यातील लक्षणे नसलेले आणि इतर आजार नसलेले बहुतांशी रुग्ण घरीच क्वारंटाईन झाले आहेत. सध्या पालिकेकडे ३ हजारांवर बेड रिक्त आहेत.