घाटकोपर,भांडुप-विक्रोळी, बोरीवलीत अधिक पसरतोय कोरोनाचा विषाणू

प्रत्येक विभागांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या वाढीचा दर सरासरी ४.९३ टक्के आहे.

Death of Sangamner's victim; Add another one in Akola
Death of Sangamner's victim; Add another one in Akola

मागील काही दिवसांपासून स्थिरावलेल्या कोरोनाचा विषाणू हा मागील आठवड्यापासून घाटकोपर, भांडुप-विक्रोळी आणि बोरीवली आदी भागांमध्ये दुपटीने पसरतानाच दिसत आहे. प्रत्येक विभागांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या वाढीचा दर सरासरी ४.९३ टक्के आहे. परंतु या तिन्ही विभागांमध्ये सरासरी रुग्णवाढीचा दर हा अनुक्रमे ८.८ टक्के, ८.२ टक्के आणि ८.१ टक्के एवढा आहे. त्यामुळे मागील सात दिवसांमध्ये रुग्णवाढीचा दर सरासरीपेक्षा दुप्पट पहायला मिळत आहे.

मुंबईत आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ हजार २७३पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये सर्वांधिक रुग्ण हे धारावी, माहिम आणि दादर या जी-उत्तर विभागात आहे. या विभागात एकूण रुग्णांची संख्या २८१६ एवढी आहे. तर भायखळा-माझगाव, शीव-अॅटॉप हिल, कुर्ला या तिन विभागांमध्ये एकूण रुग्णांची संख्या २४०० च्या वर पाहायला मिळत आहे. तर वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व आणि विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या विभागांमध्ये एकूण रुग्णांची संख्या २१०० च्या पार झालेली आहे. तर वरळी-प्रभादेवी आणि वांद्रे ते जोगेश्वरी पूर्व या विभागांमध्ये १९५० च्या वर एकूण रुग्णांची संख्या पोहोचलेली आहे. तर सर्वात कमी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहिसर आर-उत्तर विभागात पाहायला मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून घाटकोपरच्या एन विभागात रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. या विभागात सध्या १६१४ एवढी असली तरी मागील आठवड्यापासून या विभागात रुग्णवाढीचा दर सरासरी ८.८ टक्क्यांनी वाढलेला आहे. तर भांडुप-कांजूरमार्ग आणि विक्रोळी पवई या एस विभागातही २८ तारखेपर्यंत रुग्णवाढीचा दर ८.२ टक्क्यांनी वाढलेला पहायला मिळालेला आहे. या विभागात आतापर्यत एकूण रुग्णांची संख्या १३७७ वर पोहोचली आहे. तर रुग्णवाढीत तिसऱ्या क्रमांकावर बोरीवली आहे. या विभागात ८.१ टक्क्यांनी रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या या विभागात एकूण बाधित रुग्णांची संख्या ७२४ एवढी आहे.

तर त्याखालोखाल चंदनवाडी, गिरगावमध्ये रुग्णवाढीचा दर सरासरी ७.४ टक्के, तर मालाडमध्ये ७.६ टक्के आणि दहिसरमध्ये ७.९ टक्के आहे. तर रुग्ण दरवाढीचे सर्वांत कमी प्रमाण एकेकाळी कायम एक नंबर असणाऱ्या वरळी-प्रभादेवीचा आहे. या जी-दक्षिण विभागात रुग्ण वाढीचा दर ३.१ एवढा आहे. तर धारावी, दादर, माहिम या जी-उत्तर विभागातील रुग्णवाढीचा दर ३.६ टक्के एवढा आहे.