Coronavirus Mumbai: मुंबईमध्ये कोरोनाचे १५७१ नवे रुग्ण, आज ३८ मृत्यू

Over 1,400 new coronavirus cases in 24 hours take India’s tally past 21,000

मुंबईत रविवारी १५७१ नवे रुग्ण सापडल्याने मुंबईतल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ हजार ९६७ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा देखील आता ७३४ वर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेमध्ये नव्याने पदभार स्वीकारलेले पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी वेगवेगळ्या उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. आता खासगी रुग्णालयातले अतिदक्षता कक्ष देखील पालिका आपल्या ताब्यात घेणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून रविवारी त्याचा उद्रेक झाल्याचा पाहायला मिळाला. रविवारी मुंबईमध्ये तब्बल १५७१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ९६७ वर पोहचली आहे. १० ते १५ मे दरम्यान केलेल्या ५९० चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याचा समावेशही यामध्ये करण्यात आला आहे. मुंबईमध्ये ३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ७३४ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या ३८ जणांमधील १३ मृत्यू हे ८ ते १५ मे दरम्यान झाले आहेत. तसेच २३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २८ पुरुष तर १० महिलांचा समावेश आहे. मृतांमधील तिघांचे वय ४० वर्षांखालील, २० जण हे ६० वर्षांवरील, तर १५ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ६७८ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १९ हजार ३५० वर पोहचली आहे. तसेच २०६ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ५०१२ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.