Corona: दादरमध्ये फेरीवाल्यांमुळे वाढतोय कोरोना

coronavirus increase for hawkers in dadar
Corona: दादरमध्ये फेरीवाल्यांमुळे वाढतोय कोरोना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून दादरमधील सेनापती बापट मार्गावर भरणारा घाऊक बाजार बंद करण्यात आला असला तरी पुन्हा एकदा अनधिकृतपणे हा बाजार सुरू झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा बाजार सुरू असल्याचे बोलले जात आहे. पुन्हा एकदा घाऊक आणि किरकोळ बाजार सेनापती बापट मार्गावर भरू लागल्याने, भाजीपाला खरेदीसाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे आणि परिणामी या गर्दीमुळेच कोरोनाबाधितांची संख्या दादर-माहिममध्ये वाढताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.

दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळील सेनापती बापट मार्गावर दुतर्फा घाऊक भाजीचा व्यवसाय सुरू झाला असून या ठिकाणी घाऊक भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी याठिकाणी पाहायला मिळत आहे. याठिकाणी दरदिवशी १५० ते २०० टेम्पोमधून भाजीपाला उतरला जातो. पहाटेपासून भरला जाणारा बाजार सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू असतो. महापालिकेच्या बाजार विभागाने तसेच जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी पोलिसांच्या मदतीने येथील बाजार सर्व प्रथम बीकेसीमध्ये हलवला होता. परंतु तिथे गर्दी होऊ लागल्याने तसेच कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आल्याने तो दहिसरला आणि मुलूंड चेकनाक्याच्या जवळ हलवण्यात आला होता. परंतु मागील काही दिवसांपासून दादरमधील बंद असलेला घाऊक बाजार पुन्हा एकदा सुरू झालेला पाहायला मिळत आहे. याठिकाणी भाजी खरेदीला किरकोळ विक्रेते गर्दी करत असतात.

महापालिकेच्या परवानगीने हा बाजार सुरू नसला तरी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या आणि दलालांच्या मदतीने हा अनधिकृत बाजार भरला जात असून प्रत्येक टेम्पोमागे २०० ते ३०० रुपयांची वसुली काही मंडळी करून हा व्यवसाय करू देत आहेत. त्यामुळे एका दिवसांची हजारो रुपयांची उलाढाल असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीच मदत असल्याने हा अनधिकृत बाजार सुरू असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मागील दिवसांमध्ये जी-उत्तर विभागातील धारावीतील कोरोन बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. परंतु दादर आणि माहिममधील संख्या वाढत आहे. त्यातील दादरमधील कोरोनाचे रुग्ण याचमुळे वाढत असल्याचे बोलले जात आहे.

या बाजारात व्यवसाय करणारे परप्रांतिय पुन्हा गावावरून येऊन याचठिकाणी पदपथावर झोपतात आणि तेथीलच सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. मागील काही दिवसांमध्ये येथील मंडईमध्ये काही भाजी विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता .त्यानंतर एकाच मार्केटमधून दहा ते बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे एका बाजुला गर्दीचे प्रमाण कमी करून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी फेरीवाल्यांना कोणताही व्यवसाय करू दिला जात नसताना अशाप्रकारे बाजार भरवून गर्दीच्या माध्यमातून कोरोनाचा आजार अधिक पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे रहिवाशांचेही म्हणणे आहे.