घरताज्या घडामोडीCoronaVirus: नगरसेवक निधीतून अखेर मास्क, हातमोजे, सॅनिटायझर खरेदी करता येणार

CoronaVirus: नगरसेवक निधीतून अखेर मास्क, हातमोजे, सॅनिटायझर खरेदी करता येणार

Subscribe

नगरसेवकांची मागणी अखेर पूर्ण, प्रशासनाकडून सुधारीत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना आपल्या निधीतील १० लाख रुपये खर्च करण्यास प्रशासनाने मान्यता दिली. परंतु प्रत्यक्षात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार नगरसेवकांना आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी हा निधी खर्च करण्यात अनेक अडचणी येत होत्या. पण आता या परिपत्रकांमध्ये काही बाबींचा समावेश करत नगरसेवकांना या निधीतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट तसेच महापालिका कर्मचाऱ्यांसह प्रभागातील नागरिकांसाठी एन-९५ मास्क, कॉटन फेस्क मास्क, हातमोजे, सॅनिटायझर तसेच डिसइन्फेक्टेड पावडर आदींसारखे वस्तू खरेदी करता येऊ शकतात. त्यामुळे या माध्यमातून नगरसेवकांची मागणी आता प्रत्यक्षात साकारत असल्याने त्यांना विभागातील जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटाझरच्या वस्तूंचे वाटप करता येईल.

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना ६५ लाखांचा निधी व ५३ विकास निधी याप्रमाणे १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक नगरसेवकांनी स्व:खर्चातून मास्कची खरेदी करून त्याचे वाटप केले. तर अनेक नगरसेवकांनी जंतूनाशकाच्या फवारणीसाठी मशीनची खरेदी केली. याशिवाय अनेक नगरसेवकांनी विभागात जेवणाची पाकिटे तसेच जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप केले. मात्र, अशाच प्रकारचे वाटप महापालिका करत असल्याने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी या कामांसाठी नगरसेवक निधी वापरण्याची परवानगी दिली जावी, असा ठराव केला. त्यामुळे सुरुवातीला ५ ते १० लाख एवढा निधी कोरोनासाठी वापरण्यास परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, त्याबरोबरच भाजपचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे तसेच काँग्रेसच्या नगरसेविका सोनम जामसूतकर यांनीही नगरसेवक निधीतून कोरोनासंदर्भातील वस्तूंचे वाटप करण्यास परवानगी देण्याची मागणी केली. परंतु त्यानंतर प्रशासनाने याबाबतचे परिपत्रक काढताना, त्यामध्ये नगरसेवक निधीतून १० लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देताना, प्रत्यक्षात मतदारांना प्रत्यक्ष लाभ देण्याची कोणतीही तरतूद केली नव्हती. विभागातील जनतेला मास्कचे वाटप, निजंर्तुकीकरण तसेच गरीब, गरजुंना जेवणाची पाकिटे किंवा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आदींसाठी हा निधी देण्याची मागणी होती. पण नगरसेवकांना हा १० लाख रुपयांचा निधी विभागातील जनतेसाठी थेट वापरता येत नसल्याने तीव्र नाराजी पसरली होती.

- Advertisement -

अखेर प्रशासनाने ३० एप्रिल २०२० रोजी जारी केलेल्या परिपत्रकांमध्ये नगरसेवकांना आपल्या विभागातील नागरिकांना निधीतून लाभ देता येईल, अशा प्रकारच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, परिपत्रकातील अन्य बाबींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

नगरसेवकांसाठी समाविष्ठ केलेल्या या नवीन बाबींमध्ये कोविड १९अंतर्गत काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना आणि प्रभागातील अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना स्वसंरक्षणार्थ पीपीई किट तसेच महापालिका कर्मचाऱ्यांना व प्रभागातील नागरीकांना एन-९५ मास्क, कॉटन फेस्क मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, डिसइन्फेक्टेड पावडर व यासारखे मटेरियल खरेदी करण्याचा समावेश करण्यात आला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू व प्रमुख लेखापाल(वित्त) प्रदीप पडवळ आदींच्या स्वाक्षरीने या सुधारीत बाबींचे परिपत्रक प्रसारीत करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -