घरCORONA UPDATEधोका वाढला! चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतर करताना कोरोनाचा विसर!

धोका वाढला! चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतर करताना कोरोनाचा विसर!

Subscribe

समुद्रालगत राहणाऱ्या वरळी,  माहीम,  दादर अशा भागांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून समु्द्र किनारपट्टी, नदी लगत तसेच डोंगराळवर वसलेल्या लोकांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून सुरक्षित जागी स्थलांतरीत करण्यात आले होते. परंतु हे स्थलांतर करताना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सामाजिक अंतर ठेवण्याचे भानच राहिले नाही आणि त्यांनी मिळेल त्या वाहनांमध्ये लोकांना कोंबून सुरक्षित स्थळी नेले. त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे गर्दी करणे हे धोक्याचे समजले जात असून प्रशासनानेही यासर्व लोकांचे स्क्रिनिंग करूनच घरी पाठवण्याचा निर्णय घेतला असला तरी यातून कोरोनाचा ससंर्ग होऊन रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आदींनी समुद्र किनारपट्टी वसलेल्या वस्त्या, तसेच इमारती,  मिठी नदीसह इतर नदी व नाल्यांच्या लगत असलेल्या वस्त्या आणि दरड कोसळण्याची भीती लक्षात घेऊन डोंगराळ भागातून एकूण १८ हजार ८८७ लोकांना शाळांमध्ये तसेच इतर निवाऱ्यांमध्ये स्थलांतरीत केले. यामध्ये समुद्रालगत राहणाऱ्या सात हजार दोनशे व्यक्तींचा समावेश आहे. त्यात कुलाबा येथील ३००० नागरीक होते. त्यांची महापालिकेच्या  शाळेत व्यवस्था करण्यात आली होती.

- Advertisement -

मुंबई शहर जिल्ह्यात कोणतीही  जिवितहानी झाली नाही. दक्षता म्हणून प्रशासनाने किनाऱ्या लगतच्या नागरिकांचे स्थलांतर केले होते. त्या बरोबरच दहा पथके चक्री वादळामुळे होणाऱ्या नुकसानामध्ये मदत करण्यासाठी तयार होती. समुद्रालगत राहणाऱ्या वरळी,  माहीम,  दादर अशा भागांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. यात ई- विभाग,कोवळा बंदर, मिरा दातार दर्गा, भांडारवडा येथील १२००, पंजाबी कॉलनी , सायन कोळीवाडा बंगाली पुरा झोपडपट्टी,सायन,माहीम येथील १२०० , वडाळा येथील ३५०, वरळीत २५०, कुलाब्यातील गिता नगर,गणेशमूर्ती नगर ३ हजार,  डी विभागातील दर्या नगर, शिवाजी नगर, सागर नगर, रामकुंड नगर येथील १२०० अशाप्रकारे शहर भागातील ७२०० लोकांना विविध ठिकाणी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. तर उर्वरीत सुमारे ११ हजार ६०० नागरिक हे पश्चिम व पूर्व उपनगरांतील विविध भागांतील होते.

परंतु चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता यासर्वांना वाहनांमध्ये कोंबून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. तसेच ज्या शाळा तसेच निवाऱ्यांमध्ये त्यांना एक दिवसाकरता ठेवण्यात आले होते, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नव्हते. त्यामुळे आधीच कोरोनामुळे सुरक्षित अंतर ठेवून आणि विशेष काळजी घेतली जात असताना अशाप्रकारे गर्दी करत लोकांना ठेवल्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यापूर्वीच अशाप्रकारे स्थलांतरीत केलेल्या प्रत्येक नागरिकांच्या शरीराचे तापमान मोजून तसेच सर्व प्रकारची तपासणी करूनही घरी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तपासणी करण्यात आली. त्यात काही रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आल्याने त्यांना बाजुला करण्यात आले असून लक्षणे नसलेल्यांना घरी पाठवण्यात आले,असे असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘लव्ह- सेक्स’ चॅट करत महिलेने २ तरूणांना ओढलं आपल्या जाळ्यात आणि…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -