घरताज्या घडामोडीCorona Vaccination: मुंबईकरांसाठी कुणी लस देता का लस?

Corona Vaccination: मुंबईकरांसाठी कुणी लस देता का लस?

Subscribe

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राकडून राज्याला आणि राज्याकडून मुंबईला लसीचा मुबलक साठा मिळत नाही. त्यामुळे लसी अभावी चार दिवसांपूर्वी मुंबईत लसीकरण केंद्रे बंद पडली होती. आता मुंबईकरांना पुढील चार-पाच दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा पालिकेकडे शिल्लक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईला केंद्र आणि राज्याकडे लसीच्या साठ्यासाठी हात पसरत म्हणावे लागेल की, ‘कुणी लस देताय का लस’. मुंबईत रेमडेसिवीर इंजेक्शनचा, रक्ताचा डॉक्टरांचा, बेडचाही तुटवडा आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांना, ‘कुणी चांगली आरोग्य सुविधा देता का आरोग्य सुविधा’ असे म्हणण्याचीसुद्धा वेळ येणार की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रुग्णालये, बेड, डॉक्टर, स्टाफ, वैद्यकीय सुविधा यांची मोठी चणचण जाणवत आहे. मुंबई महापालिका प्रयत्नशील आहे. मात्र कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे सरकारी, पालिका, खासगी रुग्णालयात बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजन यांचा शोध घेत आहेत. फारच विदारक चित्र मुंबईत आहे. सरकारी, पालिका व जनतेची बेफिकिरी आणि कोरोनावरील राजकारण या दुर्दैवी परिस्थितीला कारणीभूत ठरले आहे. मात्र त्यात गरीब, सामान्य मुंबईकर होरपळले जात आहेत. कारण की, श्रीमंतांना सर्व सुविधा या मोठया रुग्णालयात मिळतात. अगदी घरीसुद्धा काही सुविधा उपलब्ध होतात. मात्र यात मरण होते ते गरीब, सामान्य नागरिकांचे.

- Advertisement -

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा जोर वाढलेला आहे. त्यातच लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र केंद्राकडून राज्याला व राज्याकडून मुंबईला लसीचा मुबलक लसीचा साठा काही उपलब्ध होत नाही. लसीअभावी तर गेल्या तीन – चार दिवसांत ५०% पेक्षाही जास्त लसीकरण केंद्रे बंद पडली होती. त्याचे राजकीय पडसाद जोरात उमटले होते. त्यामुळे शिवसेना – भाजपात आरोप – प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर एक लाख लसीचा साठा मुंबईला मिळाला. नंतर आणखीन काही साठा मिळाला. आता फक्त पुढील चार दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे तो साठा संपला की, पुन्हा बोंबाबोंब होणार, आरोप – प्रत्यारोप होणार आणि त्याला राजकीय वळण लागणार.

मुंबईत पाच दिवसांपूर्वी लसीचा तुटवडा जाणवला होता. त्यामुळे ८ एप्रिल रोजी ३० लसीकरण केंद्रे तर ९ एप्रिल रोजी ९० लसीकरण केंद्रे लसीअभावी बंद झाले होते ; मात्र १० एप्रिल रोजी पहाटे मुंबईला १ लाख लसीची मात्रा मिळाली. पुन्हा ४९ केंद्रांवर लसीकरण सुरू झाले होते. मात्र आता मुंबईकरांसाठी पुढील चार दिवस पुरेल इतकाच म्हणजे २ लाख ५० हजार इतक्या लसीचा साठा शिल्लक राहिला असून तो पुढील चार दिवस पुरेल इतकाच आहे. मुंबईत आतापर्यंत १७ लाख ७ हजार ९२८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

१५ एप्रिल रोजी लसीचा साठा मुंबईला मिळणार आहे. मात्र तत्पूर्वीच लसीचा साठा संपुष्टात आल्याने व त्यासाठी वेगळा साठा मुंबईला दिला गेल्याने आता १५ एप्रिल रोजी लसीचा साठा उपलब्ध झाला तरच मुंबईत लसीकरण मोहीम अशीच सुरू राहणार आहे. मात्र लसीचा साठा वेळेवर उपलब्ध न झाल्यास मुंबईकरांना, ‘ कुणी लस देता का लस’, असे हात जोडून राज्य व केंद्र सरकारपुढे उभे राहावे लागणार हे निश्चित.


हेही वाचा – लॉकडाऊनच्या भितीने मजुरांनी धरली घरची वाट,एलटीटी स्थानकांबाहेर प्रवाशांची प्रचंड गर्दी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -