अल्पवयीन मुलांनाही लस देणार; प्रतिदिन १२ हजार लसीकरणाचे लक्ष्य

अल्पवयीन मुलांनाही आता लस देण्यात येणार आहे.

Corona vaccine for children in India likely to arrive in September - NIV Director
भारतात लहान मुलांसाठी कोरोना लस सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता - NIV संचालक

कोरोना लसीकरण प्रक्रिया इतर देशात सुरवात झाली आहे. त्याप्रमाणे आता भारतातही लसीकरण प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सिरम आणि भारत बायोटेकच्या लसीला मान्यता मिळाली आहे. मुंबईत महापालिकेने लसीकरणाची सर्व तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वा लाख आरोग्य कर्मचार्‍यांना, दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील पोलीस कर्मचारी आणि कंझर्व्हेन्सी कामगारांना तर तिसर्‍या टप्प्यात ५० लाख नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यापैकी ३० लाख लोक ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असून अल्पवयीन मुलांना देखील या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून लसीकरणासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

लसीकरणाचा पहिला टप्पा १५ दिवसांत करणार पूर्ण

कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा १५ दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. प्रतिदिन १२ हजार लोकांना लस देण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. मुंबईत सध्या कोरोना नियंत्रणात असून कोरोनावर नियंत्रण मिळवून त्याला हद्दपार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणेमार्फत लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे. त्यासाठी केईएम, नायर, कूपर, सायन, व्ही. एन. देसाई, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वांद्रे भाभा या रुग्णालय या आठ ठिकाणी लसीकरण केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात किमान दोन लसीकरण केंद्रे स्थापन करण्याचा आणि टप्पाटप्प्याने किमान ५० पर्यंत केंद्रे वाढविण्याचा पालिकेचा विचार आहे. नव्या केंद्रासाठी शालेय आणि प्रशासकीय इमारतींचा विचार केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यातील लसीकरण १२ ते १५ दिवसांत पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे. मुंबईत लस आल्यानंतर अवघ्या २४ तासांतच लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.


हेही वाचा – फेब्रुवारी-मार्चपर्यंत सीरमची कोविशिल्ड लस बाजारात येईल; अदर पुनावाला यांचा दावा