स्थायी समितीच्या सभेत खड्डयांवरून नगरसेवक आक्रमक

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी खड्ड्यांच्या कामांकडे दुर्लक्ष केले त्यामुळे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. खड्डे भरल्याशिवाय कंत्राटदाराला पैसे देऊ नका अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.

corporators aggressive on pothole issue in kalyan

विधानसभा निवडणुकीत आणि सोशल मिडीयावरही रस्त्यावरील खड्डांचा प्रश्न चांगलाच गाजला असतानाच, अजूनही पालिका प्रशासनाला रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे भरलेले नाहीत. त्यामुळे सोमवारच्या स्थायी समितीच्या सभेत खड्डयांवरून नगरसेवक आक्रमक झाले होते. रस्त्यावरील खड्डे त्वरीत भरण्यात यावे तसेच कंत्राटदारांना पैसे अदा करू नका, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली.

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी खड्डयांच्या कामाकडे दुर्लक्ष

निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर सोमवारी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने आणि खड्डयांमुळे अनेकांना जीव गमवाला. या घटना घडल्याने खड्डयांवरून नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना चांगलेच धारेवर धरले होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही मनसेने खड्डयांच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली होती. मात्र पाऊस अधिक पडल्याचे कारण सांगून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी खड्डयांच्या कामाकडे दुर्लक्ष केले. स्थायी समितीच्या सभेतही शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे, नितीन पाटील, निलेश शिंदे यांनी रस्त्यावरील खड्डयांचा प्रश्न उपस्थित केला.

खड्डे न भरताच कंत्राटदाराला पैसे दिले जात असल्याचा आरोप

शहरातील रस्त्यांवर आजही खड्डे आहेत. खड्डयांमुळे नागरिक, वाहन चालक हैराण झाले आहेत. गणपती गेले दिवाळी गेली आता खड्डे कधी भरणार? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला. खड्डे न भरताच कंत्राटदाराला पैसे दिले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. तसेच २७ गावातील रस्त्यांची अवस्था खूपच बिकट झाली आहे त्याकडेही नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी यांनी सांगितले की, ‘पाऊस थांबल्याने खड्डे भरण्याची कामे लवकरात लवकर सुरू करण्यात येणार नाही. खड्डे भरल्याशिवाय कंत्राटदाराला पैसे दिले जात नाही. आतापर्यंत कोणत्याही कंत्राटदाराला पैसे अदा केलेले नाहीत. ग्रामीण भागात ड्रेनेज आणि गटारांची कामे झालेली नाहीत त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आले होते. खड्डे भरण्याच्या कामांना तातडीने सुरुवात करण्यात येणार आहे’, असेही कोळी यांनी नगरसेवकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.


हेही वाचा – मेट्रोच्या कामामुळे माहीमची इमारत झुकली!