Covid at-home test kits: आधार कार्डशिवाय होम टेस्टिंग किट मिळणार नाही – महापौर किशोरी पेडणेकर

होम कोरोना टेस्टिंगमध्ये तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल तर सांगा. लोकांनी घाबरू नका, तुमची तब्येत बिघडली तर आमची यंत्रणा सज्ज आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येतील वाढ अजूनही कायम आहे. यादरम्यान घराच्या घरी होम टेस्टिंग किट घेऊन चाचणी करण्याचे प्रमाण वाढल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले. त्यानंतर कोरोना होम टेस्टिंग किट विक्री करणाऱ्या मेडिकल आणि कंपन्यांना त्याची नोंदण करण्यास अनिवार्य केले. कारण जो व्यक्ती होम टेस्टिंग किट विकत घेत होता, तो व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर माहिती देत नव्हता. त्यामुळे आता होम टेस्टिंग किट घेताना आधार कार्ड आवश्यक असणार आहे. आधार कार्डशिवाय कोरोना होम टेस्टिंग किट मिळणार नाही, असे महापौर किशोरी पेडणेकर पत्रकार परिषदेत म्हणाले.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘१३ जानेवारी २०२२पर्यंत १ लाख ६ हजार ९८७ जणांनी स्वतःची चाचणी कोरोना होम टेस्टिंग किटद्वारे केली. यामध्ये ३ हजार ५४९ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. आता आधार कार्डनंबर दिल्याशिवाय कोरोना होम टेस्टिंग किट मिळणार नाही. जर तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल तर सांगा. लोकांनी घाबरू नका, तुमची तब्येत बिघडली तर आमची यंत्रणा सज्ज आहे.’

दरम्यान काल, शुक्रवारी मुंबईत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होऊन २४ तासांत ११ हजार ३१७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९ लाख ८१ हजार ३०६वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १६ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ८४ हजार ३५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – मुकी जनावरं आणि पाळीव प्राण्यांसाठी मुंबईत शवदाहिनी उभारणार – महापौर किशोरी पेडणेकर