घरमुंबईठाण्यात दफनभूमी जागेचा वाद चिघळला

ठाण्यात दफनभूमी जागेचा वाद चिघळला

Subscribe

ठाणे वर्तकनगर येथील बाप्टिस्ट ट्रस्टच्या 'आर' झोनमधील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या दफनभूमी, क्लब हाऊस आणि क्रीडांगणाचा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

रेप्टाक्रॉस स्मशानभूमीबाबत वाद सुरु असताना आता ठाण्याच्या वर्तकनगर येथे मोकळ्या जागेत दफनविधी केल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. लिटल फ्लॉवर चर्च जवळील सेंट बाप्टिस्ट ट्रस्टच्या ‘आर’ झोनमधील मोकळ्या जागेत दफनविधी करण्यात आला. संबंधित भूखंड ठाणे मनपाचा असून त्यावर क्रीडांगणाचे आरक्षण आहे. क्लब हाऊस आणि क्रीडांगणाचा प्रस्ताव मंजूरही झाला असून या भागातील मोकळ्या मैदानामध्ये ४ मे रोजी क्रूस रोवण्याचा प्रकार घडला. त्यामुळे परिसरातील संतप्त नागरिकांनी याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र दफनभूमीच्या समर्थकांमुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलिसांनी केली घटनास्थळाची पाहणी

हा भूखंड आमच्याकरिता असून त्याचा आम्ही दफनभूमीकरिता वापर करणार अशी भूमिका दफनभूमी समर्थकांनी घेतली. याप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला सहा आठवड्यांमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते. जितेंद्र इंदिसे यांनी या भूखंड प्रकरणी न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. ४ मे रोजी ठाण्यात बाप्टिस्ट ट्रस्टच्या ‘आर’ झोनमधील मोकळ्या जागेत क्रूस रोवण्याचा प्रकार घडला. त्यामुळे दफनभूमी समर्थक आणि विरोधकांमध्ये वादाला सुरुवात झाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी या भागात कोणत्याही प्रकारे न्यायालयाच्या आदेशाचा भंग होईल, असे कृत्य करू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या. या प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आश्वासनही येथील गृहसंकुलातील नागरिकांना देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी ६ मे रोजी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दालनात सुनावणीही घेण्यात आली. दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. मात्र मूळ मालक सेंट बाप्टिस्ट ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे सर्व पक्षकार उपस्थित असतानाच यावर निर्णय घेता येईल, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.

आयुक्तांना यापूर्वीच निवेदन देण्यात आले आहे. यासंदर्भात आमचे म्हणणे आयुक्तांनी ऐकून घेतले आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये हा सर्व प्रकार सुरू आहे. अनधिकृतपणे रहिवासी भागात अशा प्रकारे शव दफन केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आयुक्तांकडे झालेल्या सुनावणीमध्ये या पट्ट्यात राहणाऱ्या गृहसंकुलातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या बाजूने उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे.
राधिका फाटक, स्थानिक नगरसेविका, प्रभाग क्र. ७ क
- Advertisement -

वाचा – तीन वर्षाच्या मुलीने गिळले बटन सेल


क्लब हाऊस आणि क्रीडांगणाचा नकाशा महापालिकेने मंजूर केला आहे. त्यामुळे या ठिकाणी दफनभूमी तयार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सत्ताधारी पक्षाने रेप्टॉक्रॉस येथे स्मशानभूमीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्याठिकाणी स्मशानभूमी निर्माण करून दफनभूमीचा प्रश्न निकाली लावावा.
अ‍ॅड. विक्रांत चव्हाण, स्थानिक नगरसेवक, प्रभाग क्र. ७ ड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -