घरCORONA UPDATEमुंब्र्यातील तीन खासगी रुग्णालयावर गुन्हा दाखल

मुंब्र्यातील तीन खासगी रुग्णालयावर गुन्हा दाखल

Subscribe

रूग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी रूग्णालयांवर पालिकेने करडी नजर ठेवली आहे.

गोरगरीबांना उपचार नाकारून, भरमसाठ बील उकळणाऱ्या मुंब्र्यातील तीन खासगी रूग्णालयांवर पालिकेने गुन्हा दाखल केल्यानंतर आता खासगी रूग्णालयांवर पालिकेचा वचक बसला आहे. रूग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी रूग्णालयांवर पालिकेने करडी नजर ठेवली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील खासगी रूग्णालयाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कोरोनासाठी हॉटस्पॉट बनलेल्या मुंब्र्यातील  बिलाल रुग्णालय, प्राईप क्रिटीकेयर आणि युनिव्हर्सल या तीन रुग्णालयावर पालिकेकडून मुंब्रा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही रूग्णालय कोविड- १९ च्या रूग्णासाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंब्रा प्रभाग समितीमध्ये येणाऱ्या रुग्णालयामध्ये गरीब व आजारी रुग्णांना दाखल करताना, तसेच महिलांना प्रसुतीसाठी दाखल करताना भरमसाठ पैसे भरा, असे सांगितले जात होते. तसेच रुग्णालयात बेड शिल्लक असताना देखील प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेत पालिकेने आधी नोटीसही बजावली. मात्र पालिकेच्या नोटीसीकडे कानाडोळा करीत तसाच कारभार सुरू ठेवल्याने अखेर पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या आदेशाने या रूग्णालयांवर गुन्हे दाखल करून सील ठोकण्यात आले, ही कारवाई सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी, कार्यालयीन अधीक्षक बाळू पिचड, लिपीक जितेंद्र साबळे, नैनेश भालेराव यांनी केली. रूग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी रूग्णालयांविरोधात पालिकेकडून धडक कारवाई करण्यात आल्याने, खासगी रूग्णालयावर वचक बसला आहे. त्यामुळे पालिकेच्या कारवाईचे कौतूक होत असून, रूग्णांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -