Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई पालिका कंत्राटदारांवर सवलतीबरोबरच अपात्रतेची टांगती तलवार

पालिका कंत्राटदारांवर सवलतीबरोबरच अपात्रतेची टांगती तलवार

१२ टक्केपेक्षा कमी दराने टेंडर भरणाऱ्यांना अनामत रकमेत सवलत

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेने जाहिरात कंपन्या, हॉटेल्स यांना सवलती देतानाच आता पालिकेची लाखो, कोट्यवधी रुपयांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना टेंडर भरताना भरावयाच्या अनामत रकमेबाबत दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.यापुढे एखाद्या कंत्राटी कामासाठी टेंडर भरताना सर्वच कंत्राटदारांना अनामत रक्कम भरावी लागणार नाही. विशेषतः १२% पेक्षाही कमी दर भरणाऱ्या कंत्राटदारांना याचा लाभ होणार आहे. जेव्हा लघुत्तम देकार भरणारा कंत्राटदार पालिकेकडून पात्र ठरेल व त्याला कार्यादेश मिळतील त्यांनतर त्या पात्र कंत्राटदारानेच सदर अनामत रक्कम भरावयाची आहे. यापूर्वी, टेंडर भरताना सर्वच सहभागी कंत्राटदारांना अनामत रक्कम भरावी लागत असे.

मात्र जर पात्र कंत्राटदाराने कंत्राटाबाबत कार्यादेश प्राप्त झाल्यापासून पुढील १५ दिवसांत अनामत रक्कम न भरल्यास त्याला दोन वर्षांसाठी अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. वास्तविक, कंत्राटकामाबाबत टेंडर भरताना सहभागी सर्व कंत्राटदारांनी म्हणजे जे काही ३,५,७,१० कंत्राटदार असतील त्यांनी अनामत रक्कम भरली असती तर ते पैसे किमान दोन ते सहा महिने तरी प्रशासनाला वापरता आले असते. मात्र सदर कंत्राटदारांची अतिरिक्त अनामत रक्कम पालिकेकडे जमा होणार नाही. पात्र ठरणारा एकच ठेकेदार पंधरा दिवसात अनामत रक्कम प्रशासनाकडे भरणार आहे.
मुंबई महापालिकेत कंत्राटदारांमार्फत विविध कामे करण्यात येतात. सध्याच्या पद्धतीनुसार, या कामांसाठी ऑनलाईन ई-निविदा प्रक्रियेमध्ये ज्या-ज्या निविदाकारांनी वजा १२ टक्के (-१२ टक्के) पेक्षा कमी दराने टक्केवारी नमूद केली आहे, अशा सर्व निविदाकारांकडून वजा १२ टक्केपेक्षा जास्त नमूद केलेल्या प्रत्येक टक्क्याला १ टक्के याप्रमाणे, कोणतीही मर्यादा न ठेवता, अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ऑनलाईन स्वीकारली जाते. या प्रचलित तरतुदीमध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. तसेच, महापालिका कामांच्या निविदांना अधिकाधिक प्रतिसाद मिळणे शक्य होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

- Advertisement -