आर्यन खानचा जामीन पुन्हा फेटाळला

आता बुधवारी सुनावणी

Mumbai Court rejects bail pleas of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha in the cruise ship drug case

क्रूझ रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांच्या जामिनावरील सुनावणी सेशन कोर्टाने पुढे ढकलली आहे. येत्या बुधवारी दुपारच्या सत्रात या जामीन अर्जावर सुनावणी होणार असून आर्यन खान आणि इतर आरोपींचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम आणखी दोन दिवसांनी वाढला आहे.

एनसीबीने २ऑक्टोबर रोजी मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस या ठिकाणी कॉर्डिलिया क्रूझवर सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळून लावत शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली होती. या आठ जणांकडून एनसीबीने काही प्रमाणात अमली पदार्थ आणि रोकड जप्त केली होती. या आठ जणांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एनसीबी कोठडी नंतर गुरुवारी किल्ला कोर्टाने आर्यन खान सह इतरांना १४ दिवसांची एनसीबी कोठडी सुनावली होती. शुक्रवारी आर्यन आणि अरबाज याचे जामीन अर्ज किल्ला न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर सोमवारी आर्यन खान आणि अरबाज यांच्या वकिलांनी सेशन कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सोमवारी यांच्या जामिनावर सुनावणी होणार होती.

मात्र, एनसीबीकडून या जामीन अर्जावर कोर्टात आपले म्हणणे न मांडल्यामुळे तसेच एनसीबीने यासाठी आठ दिवसांची वेळ मागून घेतल्यामुळे सोमवारी सत्र न्यायालयात या दोघांच्या जामिनावर होणारी सुनावणी पुढे ढकलत न्यायालयाने बुधवारी दुपारच्या सत्रात या जामीन अर्जावर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले. जामिनावरील सुनावणी पुढे लोटल्यामुळे आर्यन खानसह इतरांच्या आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.