Cruise Drug Case : आर्यन जामीन प्रकरण, शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा CCTV व्हिडिओ SIT पथकाच्या हाती

लोअर परळच्या बिग बाजार येथे निळ्या रंगाची एक मर्सिडीज आणि दोन इनोव्हा कार दिसल्या. यातील निळ्या रंगाची मर्सिडीज ही शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिची असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून इतर दोन इनोव्हा कार या पंच किरण गोसावी आणि सॅम डिसूझा याची असल्याचा संशय आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात २५ कोटींच्या खंडणी प्रकरणात शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिचा एक सीसीटीव्ह व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या SIT पथकाच्या हाती लागला आहे. मुंबईच्या लोअर परळ भागातील हे सीसीटीव्ही फुटेज असून याच ठिकाणी २५ लाखांच्या खंडणीचे डिल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.  SIT पथकाच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पूजा ददलानीची मर्सिडीज कार दिसत आहे. त्याचप्रमाणे त्या वेळी तिथे दोन इनोव्हा कार आल्या होत्या त्यातील एक इनोव्हा कार ही पंच किरण गोसावी याची होती तर दुसरी कार ही सॅम डिसूझा याची होती अशी माहिती समोर येत आहे.

पंच आणि किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने आर्यन खान प्रकरणात २५ कोटींचे डिल झाल्याचा आरोप केला होता. हे डिल मुंबईच्या लोअर परेल भागात झाल्याचे देखील तो म्हणाला होता. त्यामुळे या माहितीनुसार मुंबई पोलीस तपास करत असून या प्रकरणी आता शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी सह आर्यन खानची देखील चौकशी करण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांच्या SIT पथकाने शोधलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, लोअर परळच्या बिग बाजार येथे निळ्या रंगाची एक मर्सिडीज आणि दोन इनोव्हा कार दिसल्या. यातील निळ्या रंगाची मर्सिडीज ही शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिची असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून इतर दोन इनोव्हा कार या पंच किरण गोसावी आणि सॅम डिसूझा याची असल्याचा संशय आहे. तसेच निळ्या मर्सिडीजमधून एक महिला खाली उतरते आणि दुसऱ्या कारजवळ असलेल्या व्यक्तीशी गप्पा मारताना दिसत असून नंतर ती पुन्हा आपल्या कारजवळ जाताना दिसत आहे. ही महिला पूजा ददलानी असून ती किरण गोसावीशी गप्पा मारत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  त्यावेळी तिथे सॅम डिसूझा आणि प्रभाकर साईल देखील उपस्थित असल्याचे दिसत आहे.  या प्रकरणाची येत्या २-३ दिवसात चौकशी होईल असे सांगण्यात येत आहे त्याचप्रमाणे पोलिसांनी आता नवी मुंबई, ताडदेवमधील काही सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात सुरुवात केली आहे.


हेही वाचा – Cruise Drugs Case: अटकपूर्व जामिनासाठी सॅम डिसुझाची मुंबई हायकोर्टात धाव