सीएसएमटी ‘वर्ल्ड क्लास’ मल्टीमोडल हबचे नवं रूप घेणार…

csmt railway station
सीएसएमटी स्थानक

मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा विमानतळाच्या धर्तींवर पुनर्विकास करण्यात येणार आहे. सीएसएमटीला जागतिक दर्जाचे मल्टिमोडल हब बनवण्याचा प्रस्ताव भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (आयआरएसडीसी) तयार केला असून हे सीएसएमटी रेल्वे स्थानकांचे पुनर्विकासाचे काम सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात या पुनर्विकास प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहेत. या पुनर्विकास प्रकल्पाचा खर्च अंदाजे १ हजार ६४२ कोटी रुपयांचा आहे.

१ हजार ६४२ कोटी होणार खर्च

मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली ही वास्तू युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. गॉथिक शैलीतील ही इमारत जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. २००८ पासून सीएसएमटी रेल्वे स्थानकाचे पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. मात्र, जागतिक वारसा लाभलेल्या या स्थानक व परिसराचे काम करण्यासाठी अनेक अडचणी होत्या. त्यामुळे त्याची मंजुरी आणि अन्य प्रक्रियांमध्ये बराच कालावधी गेला आहे. मात्र, आता या प्रकल्पाला गती मिळणार आहे. कारण आयआरएसडीसीने सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पीपीपी मोडलद्वारे पुनर्विकासासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी मूल्यांकन समितीच्या तत्वाला मंजुरी दिली आहे. सीएसएमटी पुनर्विकासासाठी पात्रता विनंती अर्ज आयआरएसडीसीद्वारे २० ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित एनआयटीमार्फत आमंत्रित केले आहे. त्यानुसार आता निविदा प्रक्रिया २२ सप्टेेंबर रोजी सुरू होणार आहे. यात पात्रता निकष पूर्ण करणार्‍या अर्जदारांना पुढील टप्प्यात सहभागी होता येईल. बोलीची संपूर्ण प्रक्रिया ही दोन-टप्प्यात असून यामध्ये पात्रता विनंती अर्ज (आरएफक्यू ) आणि प्रस्तावासाठी विनंती अर्ज (आरएफपी) यांचा समावेश आहे. आरएफपी टप्प्यावर निवडलेला बोलीदार रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि आसपासच्या रेल्वे जमिनीच्या व्यावसायिक विकास भाडेतत्वावर व्यावसायिक विकासासाठी ६० वर्षांपर्यंत आणि निवडलेल्या भूखंडांवर निवासी विकासासाठी ९९ वर्षांपर्यंत, परिचालन आणि देखभालीसह सवलतीच्या आधारावर ६० वर्षांसाठी हाती घेईल. स्थानकाच्या व्यावसायिक परिचालन तारखेनंतर वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क हे सवलत घेणार्‍याचे कायमस्वरूपी उत्पन्न असेल. पण सेवा शुल्क जे आकारले जाणार आहे ते प्रवाशांच्या तिकिटामध्ये आकारण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात रेल्वेचे तिकिटांचे दर सुद्धा वाढण्याचे चिन्ह आहेत.

रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलणार

सीएसएमटी येथे मेल-एक्स्प्रेस आणि लोकल यांच्यासाठी स्वतंत्र टर्मिनस आहे. तेथे प्रवाशांना वावरण्यासाठी मोकळी जागा निर्माण करण्यात येणार आहे. तसेच सीएसएमटी स्थानकाला लागूनच असलेल्या अ‍ॅनेक्स इमारतीसमोरील टॅक्सी स्टॅण्ड हटविण्यात येणार आहे. येणार्‍या प्रवाशांसाठी मोकळी जागा व बसण्यासाठी आसनव्यवस्था केली जाईल. तसेच ऐतिहासिक सीएसएमटी इमारत पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलरी उभारण्यात येणार आहे. मशीद बंदर स्थानकाच्या दिशेला लोकल आणि लांब पल्ल्याच्या मार्गिकांच्या यार्डचे नूतनीकरण करण्यात येईल. उपनगरीय आणि मुख्य मार्गांमध्ये प्रवाशांसाठी आणखी विभाग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलणार आहे.