घरमुंबईमहागाईमुळे सुक्या मेव्याकडे ग्राहकांची पाठ

महागाईमुळे सुक्या मेव्याकडे ग्राहकांची पाठ

Subscribe

महागाई वाढली असताना आता सुक्या मेव्याचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे चक्क ग्राहकांनी या सुक्या मेव्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या मुंबईच्या कॉफर्ड मार्केटमध्ये दिसत आहे.

सध्या सगळीकडे दिवाळीची तयारी सुरू असून, बाजार पेठा देखील आकाश कंदील, पणत्या, रंगीबेरंगी लाईट, विविध प्रकारच्या गिफ्ट्सनी सजल्या असून, बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी रेलचेल देखील सुरू आहे. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य मात्र आपला हात आखुडता घेताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षात मिठाईप्रमाणे बाजारात मिळणाऱ्या सुक्या मेव्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यंदा मात्र हे चित्र कुठेतरी बदलल्याचे पहायला मिळत आहे. वाढणाऱ्या डिझेल-पेट्रोलच्या भावामुळे आधीच महागाई वाढली असताना आता सुक्या मेव्याचे दरदेखील वाढले आहेत. त्यामुळे चक्क ग्राहकांनी या सुक्या मेव्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या मुंबईच्या कॉफर्ड मार्केटमध्ये दिसत आहे.

ऑफीस गिफ्टची देखील मागणी घटली

विशेष म्हणजे अनेक ऑफिसेसमध्ये गिफ्ट म्हणून सुक्या मेव्याचा बॉक्स दिला जातो. मात्र यंदा याची देखील ऑर्डर कमी झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. दरवर्षी कॉफर्ड मार्केटच्या दुकानांमध्ये दिवाळीमध्ये १०००, ५०० बॉक्सची ऑर्डर येत असे. मात्र यंदा ही संख्या १०० वर आल्याचे कॉफर्ड मार्केटमधील विक्रेत्यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. हे गिफ्ट पॅकेट ३०० पासून सुरू होऊन २००० रुपयांपर्यंत बाजारात मिळत असून, त्यामध्ये विविध प्रकार देखील आहेत.

- Advertisement -

असे आहेत सध्याचे दर

  • बदाम – ८०० रुपये (प्रति किलोपासून सुरू)
  • काजू – ८८० रुपये ( प्रति किलोपासून सुरू)
  • फ्लेवर काजू – १२०० रुपये ( प्रति किलोपासून सुरू)
  • पिस्ता – १२००० रुपये (पासून सुरू)
  • अक्रोड- १००० (पासून सुरू)
  • जरदालू – ८०० (पासून सुरू)
  • अंजीर – १००० (पासून सुरू)
  • मनुके – ४०० रुपये किलो पासून सुरू

दरवर्षी आमची दिवाळी आधी धावपळ असते. आधी महिनाभर मोठ मोठ्या ऑर्डर यायच्या यंदा मात्र अजून तरी अशा ऑर्डर आल्या नसून, ग्राहकांनी देखील पाठ फिरवली आहे.
– फैजल खान, विक्रेते

गिफ्ट बॉक्स, टोकऱ्यानाही फटका

सुका मेवा देण्यासाठी विविध पद्धतीचे गिफ्ट बॉक्स, विविध आकाराच्या लाकडी टोकऱ्याचा वापर केला जातो. मात्र सुक्या मेव्याच्या ऑर्डर घटल्यामुळे आपोआपच गिफ्ट बॉक्स आणि टोकऱ्याचीही मागणी घटल्याचे गिफ्ट बॉक्स आणि लाकडी टोकऱ्या विकणारे फैसल खान यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

मी दरवर्षी एक ते २ किलो सुका मेवा दिवाळीला घेऊन जायचे. मात्र यंदा हे दर पाहिले तर सुका मेवा यंदा घेऊ की नको असा प्रश्न मला पडू लागला आहे.
– मिनाक्षी गवस, ग्राहक

ऐन सणाच्या काळात वाढले दर

सुका मेव्याच्या किमतीत अचानक ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने वाढ झाल्यामुळे खरच सुका मेवा खरेदी करावा का? असा प्रश्न आता ग्राहकांना पडू लागला आहे. जे बदाम आधी ७५० रुपये प्रतिकिलो मिळत होते तेच आता ८०० रुपये झाल्यामुळे ग्राहक चिंतेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -