घरCORONA UPDATECyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी; दहिसर, बीकेसी, मुलुंड जंबो कोविड सेंटरमधील रुग्णांचे...

Cyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी; दहिसर, बीकेसी, मुलुंड जंबो कोविड सेंटरमधील रुग्णांचे स्थलांतर

Subscribe

चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील जंबो कोविड आरोग्य केंद्रांमध्ये मिळून एकूण ५८० कोरोनाबाधित रुग्णांचे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी या रुग्ण स्थलांतर कार्यवाहीबाबत नियोजन व आढावा बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली.

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर केले जात आहे. प्रामुख्याने तीन जंबो कोविड केंद्रांतील मिळून ५८० रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये आज रात्रीच सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरु करावयाची आहे, असे काकाणी यावेळी म्हणाले.

- Advertisement -

यामध्ये दहिसर कोविड केंद्रातील १८३, बीकेसी कोविड केंद्रातील २४३ आणि मुलुंड कोविड केंद्रातील १५४ रुग्णांचा समावेश आहे. यात अतिदक्षता उपचार, ऑक्सिजन पुरवठा या वर्गवारीप्रमाणे स्थलांतर करताना ऑक्सिजन पुरवणारे सिलेंडर्स, सुसज्ज रुग्णवाहिका, आवश्यकता भासल्यास इंजेक्शन व इतर संयंत्रांसह रुग्णांना सुरक्षितपणे स्थलांतरित करण्याचे निर्देश काकाणी यांनी यावेळी दिले.

रुग्ण स्थलांतरित करण्यात आल्यानंतर त्याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळवावी, ज्या रुग्णालयात प्रत्यक्ष स्थलांतर केले आहे, तिथे आवश्यक ती सर्व व्यवस्था उपलब्ध आहे, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. तसेच प्रत्यक्ष स्थलांतर सुरु करताना वाहतूक पोलिसांसमवेत आवश्यक तो समन्वय साधावा, अशी सूचनाही काकाणी यांनी केली.

- Advertisement -

या बैठकीत उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर, उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे, उपआयुक्त विश्वास शंकरवार, उपआयुक्त पराग मसूरकर, संचालक (प्रमुख रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये) डॉ. रमेश भारमल, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांच्यासह विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, संबंधित उपआयुक्त व इतर यंत्रणांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -