Cyclone Tauktae Update: मुंबईकरांनो तोक्ते चक्रीवादळामुळे उद्या कोरोना लसीकरण बंद

Cyclone Tauktae Update corona vaccination is likely to remain closed tomorrow in Mumbai
Cyclone Tauktae Update: मुंबईकरांनो तोक्ते चक्रीवादळामुळे उद्या कोरोना लसीकरण बंद

अरबी समुद्रात घोंघावत असलेले तोक्ते चक्रीवादक (Cyclone Tauktae) अधिक सक्रिय झाले असून ते आता गुजरातच्या दिशेत सरकत आहे. येत्या १२ तासांत तोक्ते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकणार आहे. सध्या गोवा किनारपट्टीपासून चक्रीवादळ ३५० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला असून अनेक गावातून लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या मुंबईतील कोरोना लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपात्कालीन विभागात जाऊन पाहणी केली. त्यावेळेस त्या म्हणाल्या की, ‘तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत उद्या लसीकरण बंद असेल. मंगळवारी नेहमीप्रमाणे लसीकरण सुरू करण्यात येईल.’

दरम्यान मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यावर महापालिकेने अलर्ट घोषित केला आहे. चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेने २४ वार्डामधील नियंत्रण कक्ष सज्ज करण्यात आले आहेत. तसेच कोळीवाड्यातील नागरिकांना गरज भासली तर इतर ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय खबरदारी म्हणून दहिसर, बीकेसी, मुलूंड जंबो कोविड सेंटर मिळून एकूट ५८० रुग्णांचे रात्रीच स्थलांतर करणार असल्याची माहिती महापालिकेने दिली होती. मुंबईत सध्या ३६ हजार ६७३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – Cyclone Tauktae Update: गुजरात किनारपट्टीला १८ मे रोजी धडकणार शक्तीशाली तोक्ते चक्रीवादळ