सायरस मिस्त्री अपघात; उच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळली

हंगामी मुख्य न्यायाधीश एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. संदीप मारने यांच्या खंडपीठासोर या याचिकेवर सुनावणी झाली. या घटनेसाठी किरकोळ कलमे लावण्यात आली आहेत. या घटनेसाठी आरोपीवर सदोष मनुष्य वधाचे कलम लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

मुंबईः उद्योगपती व टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

हंगामी मुख्य न्यायाधीश एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. संदीप मारने यांच्या खंडपीठासोर या याचिकेवर सुनावणी झाली. एस. एस. झेंडे यांनी adv विकार राजगुरु यांच्यामार्फत ही याचिका केली होती. या घटनेसाठी किरकोळ कलमे लावण्यात आली आहेत. या घटनेसाठी आरोपीवर सदोष मनुष्य वधाचे कलम लावण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

घटना झाली तेव्हा आरोपी डॉ. अनहिता पंडोल या दारु प्यायल्या होत्या. त्या जेथे दारू प्यायल्या होत्या तेथील सीसीटीव्ही फुटेज आहेत. खात्रीलायक सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. डॉ. अनहिता पंडोल घटनेच्या दिवशी दारू प्यायल्या नव्हत्या हे रक्त चाचणीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे, असे गेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले.

त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने ही याचिका मंगळवारी फेटाळून लावली. कोणतीही माहिती शपथपत्रावर न्यायालयात दिली जाते. सुत्रांच्या माहितीनुसार दावा केला जात नाही. या घटनेचे आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ४ सप्टेंबर २०२२ रोजी चारोटी जवळील सूर्या नदी पुलावर सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज बेंझ या कारला अपघात झाला होता.या अपघातात सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांचे सहकारी जहांगीर पंडोल यांचा जागीच मृत्यू झाला होता.तर कार चालक अनहिता पंडोल आणि दारीयस पंडोल हे गंभीर जखमी झाले होते. कार चालक अनहिता पंडोल यांच्यावर बेदरकारपणे कार चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. भरधाव वेगाने वाहन चालविणे,हलगर्जीपणा,इतरांचा जीव धोक्यात घालणे अशी कलमे अनहिता यांच्या विरोधात नोंदविण्यात आली. याप्रकरणी पालघर पोलिसांनी डहाणू न्यायालयात ६ जानेवारी २०२३ रोजी १५२ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.