मुंबई : दादर रेल्वे स्थानक हे असे स्थानक आहे, जिथे कायमच प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते. परंतु, हे स्थानक महिलांसाठी असुरक्षित आहे का? असा प्रश्नही या स्थानकात घडणाऱ्या काही घटनांमुळे निर्माण झाला आहे. पण आता सोमवारी (ता. 06 जानेवारी) भरदिवसा एका महाविद्यालयीन तरुणीचे एका माथेफिरूने केस कापल्याची माहिती समोर आली आहे. 19 वर्षीय तरुणी सकाळी माटुंगा येथील महाविद्यालयात जात असताना तिच्यासोबत घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर माथेफिरूला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी सुद्धा याच ठिकाणी अशीच घटना पत्रकार तरुणीसोबत घडली होती. (Dadar Railway Station unsafe for women A young girl hair was cut by a head spinner)
समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी कल्याण येथे राहणारी तरुणी माटुंगा येथील महाविद्यालयात जाण्यासाठी दादर रेल्वे स्थानकात उतरली. साधारणतः सकाळी 9.15 वाजताच्या सुमारास ही तरुणी दादर स्थानकावर उतरल्यानंतर ती दादरच्या मेन ब्रीजवर आली. यानंतर तिकीट बुकिंग करतात त्या खिडकीजवळ पोहोचली असताना तिला मागच्या बाजूला अचानक काहीतरी काटेरी टोचल्यासारेखे जाणवले. त्यामुळे तिने मागे वळून पाहिले असता, एक व्यक्ती बॅग घेऊन पुढे घाईघाईत जाताना दिसला. याचवेळी तिने खाली पाहिले असता, तरुणीला केस पडलेले दिसले. ज्यामुळे तिने स्वतःच्या केसांवर हात फिरवला असता, तिला तिचे केस मधेच कापल्याचे आढळले. ज्यानंतर घाबरलेल्या तरुणीने त्या माथेफिरुचा पाठलाग केला. परंतु, गर्दीचा फायदा घेत या विकृत मनःस्थिती असलेल्या व्यक्तीने तिथून पळ काढला.
यानंतर तरुणीने धाडस करत सदर घटनेची माहिती मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी सुद्धा तरुणीची तक्रार नोंदवून घेत तपास करण्यास सुरुवात केली. या घटनेच्या तक्रारीनंकर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. तर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी माथेफिरूला ताब्यात घेतले आहे. परंतु, सदरील माथेफिरू तोच व्यक्ती आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी तक्रारदार तरुणीला पोलीस ठाण्यात बोलावले असल्याचे सांगण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात सुद्धा अशीच घटना पत्रकार असलेल्या तरुणीसोबत घडली होती. परंतु, तिने त्या व्यक्तीला पाहिले नव्हते. मात्र, या घटनेनंतर तिच्याही मनात याबाबतची भीती बसली आहे.
हेही वाचा… Mumbai Crime : सीएसएमटीत व्यापाऱ्यावर गोळीबार, पोलिसांकडून दोघांना अटक
दादर रेल्वे स्थानकात महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. कारण जुलै महिन्यात ऑन ड्युटी असणाऱ्य पत्रकार तरुणीची एका विकृताने चालता चालता दादर स्थानकाच्या ब्रिजवर छेड काढली होती. या घटनेनंतर त्या तरुणीने सुद्धा याला विरोध करत त्याला मारले होते. पण तो विकृत या घटनेनंतर घटनास्थळावरून पसार झाला होता. परंतु, पत्रकार तरुणीने याबाबतची माहिती दादर लोहमार्ग पोलिसांना देत त्या विकृताची तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनीही वेळ न घालवता सीसीटीव्ही फुटेज तपासून काही तासांतच त्या विकृताला अटक केली. पण सर्वच तरुणी किंवा महिला अशा प्रकारच्या घटनांमध्ये धाडस दाखवत नाही. ज्यामुळे दादर रेल्वे स्थानाकातील महिलांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दादर रेल्वे स्थानकावर काही तास वगळले तर कायमच वर्दळ पाहायला मिळते. मुंबईतील रेल्वे स्थानकांपैकी दादर हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. तर या ठिकाणाहून मुंबईबाहेर जाणाऱ्या ट्रेनही सुटत असल्याने अनेक प्रवासी या स्थानकावरून दूर पल्ल्यांच्या गाड्यांसाठी येत असतात. तर अनेक महत्त्वाची कार्यालय दादरमध्ये असल्याने कामाला जाणाऱ्या महिला याच स्थानकात उतरतात. मात्र, महिलांशी संबंधित घटना वारंवार घडत असल्याने महिलांना आपल्या सुरक्षेबाबतची चिंता सतावू लागली आहे.