मुंबईतील धोकादायक इमारती व दरड भागातील घरे पोलिसांद्वारे करणार रिकामी

जीवित हानी टाळण्यासाठी होणार कार्यवाही, मुंबई शहर व उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या बैठकित आदेश

Dangerous Buildings and Houses in the affected areas will be evacuated with the help of mumbai police

मुंबई : मुंबईत सध्या धोकादायक इमारती व दरडग्रस्त भागातील घरे संभाव्य दुर्घटनांची शक्यता लक्षात घेता जीवित व वित्तीय हानी टाळण्यासाठी तातडीने खाली करण्यात यावीत. प्रसंगी त्यासाठी पोलीस बळ वापरण्यात यावे, असे आदेश मुंबई शहर व उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या बैठकित संबंधित अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात धोकादायक इमारती, घरे, दरड कोसळण्याच्या काही घटना घडतात. यंदाच्या पावसाळ्यात कुर्ला येथे धोकादायक इमारत कोसळून १९ जण मृत्युमुखी पडले. तर चुनाभट्टी येथे दरड कोसळून ३ जण जखमी झाले. या घटनांची गंभीर दखल घेऊन मुंबई शहर व उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या सभागृहात घेण्यात आली.

मुंबई महापालिका क्षेत्रात मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांसाठी दोन स्वतंत्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे आहेत. महापालिका अतिरिक्तआयुक्त आश्विनी भिडे या मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा आहेत. तर अतिरिक्त आयुक्त आशिष कुमार शर्मा हे मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजीव कुमार, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आर. डी. निवतकर, मुंबई पोलीस दलाचे आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रतिनिधी, मुंबई अग्निशमन दलाचे व बृहन्मुंबई सुरक्षा दलाचे संबंधित अधिकारी, मध्य व पश्चिम रेल्वे, बेस्ट उपक्रम, तटरक्षक दल, म्हाडा, एम.एम.आर.डी.ए., एम.टी.एन.एल., वाहतूक पोलीस, विविध रुग्णालये, विविध स्वयंसेवी संस्था इत्यादींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रातील अति धोकादायक इमारतींची प्राधान्यक्रम यादी निश्चित करून सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार मुंबई पोलिसांच्या सहकार्याने सदर इमारती रिकाम्या करून घ्याव्यात. त्याचबरोबर दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी देखील सुनिश्चित व निर्धारित कार्यपद्धतीनुसार तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश
अतिरिक्त आयुक्त व मुंबई उपनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा अश्विनी भिडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी, अति धोकादायक इमारती रिकाम्या करून घेण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांकडून आवश्यक असणारे सहकार्य पालिकेला तात्काळ उपलब्ध करून दिले जाईल, असे आवर्जून नमूद केले.
याच बैठकीदरम्यान, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्या विषयी आवश्यक ती कार्यवाही २४ तासांच्या आत करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व प्रशासकीय विभागांना दिले.


बारावीच्या विद्यार्थ्यांना 9 जुलैला मिळणार प्रवेशपत्र