घरमुंबईनौपाडा परिसरात धोकादायक होर्डींग्ज केव्हाही घडू शकते दुर्घटना

नौपाडा परिसरात धोकादायक होर्डींग्ज केव्हाही घडू शकते दुर्घटना

Subscribe

ठाण्याला स्मार्ट सिटीचा दर्जा देण्याकरिता ठाणे महानगर पालिकेने कंबर कसली असली तरी कचरा प्रश्न आणि अनधिकृतपणे लागणारे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्ज यांचे नियोजन मात्र अद्यापही करता आलेले नाही. अगदी स्टेशन परिसरातील नौपाडा प्रभागात अनधिकृत होर्डींग्जच्या नियमांना डावलून अनेक ठिकाणी मोठ मोठ्या होर्डिंग्ज लावण्यात आल्या आहेत. या होर्डींग्जना इमारतीच्या भिंतींचा आधार देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात या होर्डींग्ज कोसळून मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

गावदेवी मंदीरापासून सुरु झालेला नौपाडा रोड शाहू मार्केटच्या चौकापर्यंत आहे. उच्चभ्रू परिसर म्हणून हा ओळखला जातो. नौपाडा म्हणजे ठाणे असे समीकरण असलेला हा परिसर नेहमीच गजबजलेला असल्यामुळे अनेक इमारतीच्या सोसायट्यांनी कमवण्याचे साधन म्हणून आपल्या इमारतीच्या भिंतींच्या आधारे मोठमोठे होर्डींग्ज उभे केले आहेत. गावदेवी मंदीराच्या काही अंतरावरच नालंदा चेंबर्स नावाची इमारत आहे. या इमारतीच्या भिंतीचा आधार घेऊन तीन तीन होर्डींग्ज लावण्यात आले आहेत. यातील काही होर्डींग्ज अतिशय जीर्ण अवस्थेत असून ते कधीही कोसळू शकतात अशी स्थिती आहे. मात्र याबद्दल पालिकेचे अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. तिच परिस्थिती त्यापुढील इमारतींच्याबाबत आहे. एकीकडे ठाणे महापालिका आयुक्त, महापालिकेची परवानगी न घेताच अनधिकृतपणे होर्डींग्ज आणि बॅनर्स लावणार्‍यांविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्यासोबतच एफआयआर दाखल करण्याचे आदेश देतात. मात्र त्याचवेळी ठामपाचे अधिकारी या गोष्टींकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करित असल्याची चर्चा ठाण्यामध्ये आहे.

- Advertisement -

अनधिकृत पोस्टर्स, होर्डींग्ज, बॅनर्सप्रकरणी हायकोर्टाने दिलेले आदेशांची केवळ अंमलबजावणी करण्याची मानसिकताही ठामपा प्रशासनात नसल्याने होर्डींग्ज दिवसेंदिवस वाढतच आहेत. ठाणे स्टेशनच्या सॅटीस परिसरातून सुरु होणारे अनधिकृत होर्डींग्ज, बॅनर्स् घोडबंदर रोड पार करून भाईंदरपर्यंत विस्तारले आहेत. कळवा, खारीगाव ते मुंब्रापर्यंत या होर्डींग्जनी शहराला विद्रुप केले आहे. मात्र यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.
-मनिष वाघ, स्थानिक रहिवाशी, नौपाडा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -