घरमुंबईदाऊदला आणखी एक धक्का; हस्तकाला अहमदनगरमधून अटक

दाऊदला आणखी एक धक्का; हस्तकाला अहमदनगरमधून अटक

Subscribe

दाऊदच्या हस्तकाला खंडणी विरोधी पथकाने अहमदनगरमधून अटक केली आहे. रामदास रहाणे असे या हस्तकाचे नाव असून त्याच्याकडून एक पिस्तुल देखील जप्त करण्यात आले आहे. रामदास रहाणेवर ११ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

मुंबई क्राईम ब्रांचने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला जोरदार धक्का दिला आहे. दाऊदचा प्रमुख हस्तक असणाऱ्या रामदास रहाणेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रामदास रहाणेला अहमदनगरमधील राहत्या घरातून बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. यावेळी रामदासकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आली आहे.

खंडणी विरोधी पथकाच्या कारवाईने दाऊदच्या साम्राज्याला हादरा बसायला सुरूवात झाली आहे. भारतातल्या व्यावसायिकाने दुबईमध्ये मित्राच्या साथीने हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायामध्ये सुमारे ५ लाख दिराम इतकी गुंतवणूक करण्यात आली होती. दाऊदकडून या व्यावसायिकाला खंडणीसाठी फोन येत होते. पण, व्यावसायिकाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर दाऊदच्या इशाऱ्यावरून व्यवसायिकाच्या मित्राला २००१ साली ठार करण्यात आले. या धक्क्यानंतर व्यावसायिकाने हॉटेल विकून दाऊदला पैसे दिले. त्यानंतर देखील व्यावसायिकाला ५० लाखांच्या खंडणीसाठी पाकिस्तानातून फोन येत होते. शिवाय, पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली जात होती. त्यामुळे व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फिर्यादीला संरक्षण दिले होते. या साऱ्या घटनेमागे रामदास रहाणे असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानंतर खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून खंडणी विरोधी पथकाने रामदास रहाणेला बेड्या ठोकल्या.

- Advertisement -

मुंबईतील गोळीबारात रहाणेचा हात

मुंबईतील व्यावसायिक ढोलकिया यांच्या कार्यालयावर २०११ साली गोळीबार झाला होता. रामदास रहाणे हा त्यातील प्रमुख आरोपी आहे. रामदास रहाणेवर मुंबई आणि गुजरातमध्ये मिळून ११ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शिवाय, अनेकजण रामदास रहाणेच्या रडारवर देखील होते. त्याच्या अटकेमुळे पुढील अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली. दरम्यान, रहाणेला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे दाऊदला जोरदार धक्का बसला असेल हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -