घर देश-विदेश दाऊद, शकीलला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु; एनआयएची विशेष न्यायालयात माहिती

दाऊद, शकीलला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु; एनआयएची विशेष न्यायालयात माहिती

Subscribe

मुंबईः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि गॅंगस्टर छोटा शकीलला भारत आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईच्या विशेष न्यायालयात दिली. दाऊद आणि शकीलचे कायदेशीर प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचेही एनआयएने न्यायालयात सांगितले.

गेल्या वर्षी छोटा शकीलचा मेहुणा आरिफ अबुबकर शेख उर्फ भाईजानला एनआयएने मुंबईतून अटक केली. एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मुंबईतील पश्चिम उपनगरातील ओशिवरा छापे टाकले. या छाप्यात अबुबकर शेख आणि शब्बीर या दोघांना तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. हे दोघेही दाऊदचा हस्तक छोटा शकीलच्या थेट संपर्कात असल्याचे तसेच त्यांनी दाऊदसाठी फायनान्स केल्याचे भक्कम पुरावे एनआयएला मिळाले.

- Advertisement -

शब्बीर आणि आरिफने अनेक धक्कादायक माहिती एनआयए अधिकार्‍यांना तपासात दिली. या दोघांनी दाऊदसाठी मोठ्या प्रमाणात खंडणी वसुली केली असून हा पैसा दहशतवादी कारवायासाठी पाठविल्याचा आरोप आहे. आरिफने विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. एनआयएचे विशेष न्यायाधीश जी. डी. शेळके यांच्यासमोर आरिफच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. या अर्जाला एनआयएने विरोध केला. एनआयएचे ज्येष्ठ वकील सुंदिप सदावर्ते यांनी आरिफचा जामीन फेटाळावा अशी मागणी केली. भारतात अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा कट दाऊदने रचला आहे. भारतातील बड्या व्यक्ति दाऊदच्या रडारवर आहेत. दाऊदच्या कटाला आर्थिक बळ देण्याचे काम आरिफ करत होता. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशी मागणी ज्येष्ठ वकील सदावर्ते यांनी केली. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने आरिफचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

या सुनावणीतच ज्येष्ठ वकील सदावर्ते यांनी दाऊद आणि शकीलच्या प्रत्यार्पणाची माहिती न्यायालयाला दिली.  गेल्या वर्षीही आरिफने जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावेळीही न्यायालयाने आरिफला जामीन नाकारला होता. त्यानंतर पुन्हा आरिफने जामीनासाठी अर्ज केला होता.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -