घरमुंबईआई कुठे आहे? अस्मिताच्या मुलाचा कुटुंबियांना प्रश्र्न

आई कुठे आहे? अस्मिताच्या मुलाचा कुटुंबियांना प्रश्र्न

Subscribe

अंधेरी गोखले पूल दूर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. गेले ४ दिवस अस्मिता यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते.

अंधेरी गोखले पूल दूर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. गेले ४ दिवस अस्मिता यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी अस्मिता यांना मृत घोषित केलं. अस्मिता काटकर यांचा मुलगा सिद्धेश सतत त्याच्या आई बद्दल विचारतोय. दूर्घटना झाल्यापासून सिद्धेशने आपल्या आईला पाहिलेलं नाही. आजी सतत रुग्णालयात जाते हे त्याला माहीत आहे. तो सर्वांना एकच प्रश्न विचारतोय की माझी आई कुठे आहे. घरात सतत येणाऱ्या लोकांना बघून तो बिथरतोही. पण, नेमकं काय घडतंय? हे मात्र त्याला कळत नाही.

अस्मिता यांच्या आकस्मिक जाण्याने काटकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे‌. पहिलीत शिकणाऱ्या अस्मिता यांचा मुलगा सिद्धेश याला मात्र एकच प्रश्न पडलाय की माझी आई कुठे आहे? त्याच्या या केविलवाण्या प्रश्नाला नेमकं काय उत्तर द्यावं? हे काटकर कुटुंबाला मात्र कळत नाही.

- Advertisement -

३ जूलैला दूर्घटना घडल्यानंतर अस्मिता यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या दुसऱ्या दिवशीच सिद्धेशची आत्या रेश्मा चौकेकर त्याला घाटकोपरला घेऊन गेल्या. तेव्हापासून आतापर्यंत सिद्धेश आत्याकडेच आहे. त्याने एकदाही त्याच्या आईला बघितलेलं नाही असं त्याची आजी सुलोचना काटकर यांनी ‘माय महानगर’शी बोलताना सांगितलं.

” सिद्धेश १५ दिवसांपासूनच शाळेत जात होता‌. त्यादिवशी खूप पाऊस होता म्हणून तिला रिक्षाने जा म्हणून सांगितलं होतं. पण, ती पायी गेली. शेवटी जे नशिबात असेल तेच घडतं. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही.

- Advertisement -

-सुलोचना काटकर, सिद्धेशची आजी

” आज सिद्धेशला रुग्णालयात घेऊन जायचा निर्णय घेतला होता. पण, दिवसभर पाऊस खूप असल्याकारणाने दुपारी उशिरा २ वाजता रुग्णालयात गेले. शेवटपर्यंत तिच्याजवळच होते. पण, आता त्याला उद्या दाखवावंच लागणार आहे.

 रेश्मा चौकेकर,सिद्धेशची आत्या

दरम्यान गोखले पूल दुर्घटनेत एकूण ५ जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी व्दारकाप्रसाद शर्मा यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची परिस्थिती स्थिर आहे. तर गिरीधारी सिंग यांचीही प्रकृती स्थीर आहे. तसच मनोज मेहता यांना नानवटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तसेच हरीष कोळी यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -